RSA vs ENG : यंदाच्या वर्ल्डमधील सर्वात मोठा विजय! गतविजेत्या इंग्लंडचा 230 धावांनी लाजीरवाणा पराभव
Cricket world cup 2023 : वर्ल्ड कपचा 20 वा सामना साऊथ अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे.
South Africa vs England : वर्ल्ड कपचा 20 वा सामना (Cricket world cup) साऊथ अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. साऊथ अफ्रिकेने इंग्लंडसमोर 400 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला पार करताना इंग्लंडचा संघ 170 वर ऑलआऊट झाला. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen) 67 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. तर जेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) याने 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
साऊथ अफ्रिकेने दिलेल्या 400 धावांचं आव्हान पार करताना इंग्लंडची पळताभुई थोडी झाली. इंग्लंडचा एकही फलंदाज मैदानात ताव धरू शकला नाही. जॉनी बेयरस्टो आणि डेविड मालन झटपट बाद झाले. त्यानंतर जो रूट आणि बेन स्टोक्स या दोन्ही फलंदाजांनी लवकर घरचा रस्ता पकडला. हॅरी ब्रुकने थोडी खटपट केली खरी पण त्याच्या पदरी देखील अपयश आलं. अखेरीस गस एटकिंसन आणि मार्क वुड यांनी दांडपट्टा चालवला पण इंग्लंडला यश आलं नाही. अखेर इंग्लंडचा संघ 170 धावांवर ऑलआऊट झाला.
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने हेनरिक क्लासेनच्या झंझावाती शतकाच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 399 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 400 धावांचे लक्ष्य दिलं होतं. साऊथ अफ्रिकेची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर एडन मार्करामने 42 धावांची खेळी केली. साऊथ अफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने 67 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. मार्को जॉन्सनने शेवटी फिनिशिंग टच दिला. मार्को जॉन्सनने 42 चेंडूत 75 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. इंग्लंडकडून रीस टोपलीने तीन, आदिल रशीद आणि गस ऍटकिन्सनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
साऊथ अफ्रीका: क्विंटन डी कॉक (WK), रीजा हेंड्रिक्स, रासी वैन डेर डुसेन, एडेन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को जानसन, गेराल्ड कोएत्ज़ी, केशव महाराज, कैगिसो रबाडा, लुंगी एनगिडी
इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, हैरी ब्रूक, जोस बटलर (C), डेविड विली, आदिल राशिद, गस एटकिंसन, मार्क वुड, रीस टॉपले