डरबन : दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन यानं विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी स्टेननं भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांचं रेकॉर्ड मोडलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विकेटच्याबाबतीत डेल स्टेन कपिल देव यांच्या पुढे गेला आहे. डेल स्टेन यानं श्रीलंकेच्या लेहरु थिरमानेची विकेट घेऊन कपिल देव यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. तर ओशाडा फर्नांडोची विकेट घेऊन स्टेननं कपिल देव यांचं रेकॉर्ड मोडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल देव यांनी १३१ टेस्टमध्ये ४३४ विकेट घेतल्या होत्या. तर स्टेननं त्याच्या ९२ व्या टेस्टमध्ये कपिल देव यांचा ४३४ विकेटचा विक्रम मोडीत काढला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीत स्टेन आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या मॅचमध्ये स्टेनला इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचा ४३७ विकेटचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. या मॅचमध्ये आत्तापर्यंत ३ विकेट घेतल्यामुळे स्टेनच्या खात्यात ४३६ विकेट झाल्या आहेत.


सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन ८०० विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये शेन वॉर्न(७०८), अनिल कुंबळे(६१९), जेम्स अंडरसन (५७५), ग्लेन मॅकग्राथ(५६३), कोर्टनी वॉल्श (५१९), स्टुअर्ट ब्रॉड(४३७), डेल स्टेन (४३६ विकेट), कपिल देव (४३४), रंगना हेराथ(४३३), रिचर्ड हेडली(४३१) यांचा समावेश आहे.


मागच्या ३ वर्षांमध्ये डेल स्टेनला दुखापतींमुळे फार क्रिकेट खेळता आलं नाही. आता त्यानं पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये पुनरागमन केलं आहे. डेल स्टेन हा टेस्ट क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. या यादीत शेन पोलॉक दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेन पोलॉकनं १०८ टेस्टमध्ये ४२१ विकेट घेतल्या होत्या.