केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याआधी मोठी घोषणा केली आहे. अमोल मुझुमदारची दक्षिण आफ्रिकेच्या अंतरिम बॅटिंग प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. अमोल मुझुमदारने डेल बेंकेस्टाईन यांची जागा घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम १५ सप्टेंबरपासून भारताविरुद्ध ३ टी-२० आणि ३ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अमोल मुझुमदार या भूमिकेसाठी योग्य आहे. त्याला भारतीय वातावरणात खेळण्याची पुरेपुर माहिती आहे. आमच्या बॅट्समनना भारतात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल याची त्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आम्हाला त्याची मदत होईल. अमोलने नुकतीच आम्हाला स्पिन बॉलिंग कॅम्पमध्ये मदत केली. यामुळे एडन मार्करम, टेम्बा बऊमा आणि जायबर हम्जासोबत चांगले संबंध तयार झाले आहेत,' असं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संचालक कोरी वान जिल म्हणाले.


४४ वर्षांच्या अमोल मुझुमदारने २० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये १७१ प्रथम श्रेणी मॅच, ११३ लिस्ट ए मॅच आणि १४ टी-२० मॅच खेळल्या. प्रथम श्रेणी मॅचमध्ये अमोलने ११,१६७ रन केले. रणजी ट्रॉफीमध्ये १० हजारपेक्षा जास्त रन करणाऱ्या काही खेळाडूंमध्ये अमोल मुझुमदार एक आहे. निवृत्तीनंतर अमोल मुझुमदार बॅटिंग प्रशिक्षक झाला. आयपीएलमध्ये त्याने राजस्थानच्या टीमला बॅटिंगचे धडे दिले.


दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अमोल मुझुमदार म्हणाला, 'ही जबाबदारी मिळाल्यामुळे मी खूप उत्साही आहे. मला नव्या खेळाडूंची मदत करायची आहे. मी जवळपास २५ वर्ष मैदानात खेळाडू म्हणून वावरलो, आता पुढची २५ वर्ष खेळाडूंना मदत करण्याची माझी इच्छा आहे.'