नवी दिल्ली : क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी भारतीय खेळाडूंसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील १५२ अॅथलिट्सला स्टायपेंड म्हणून प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी केली आहे.


टोक्यो ऑलिम्पिक, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्सची तयारी करणाऱ्या १५२ अॅथलिट्सला हा भत्ता दिला जाणार आहे. आगामी गेम्सची तयारी करण्याच्या दृष्टीने ही रक्कम खूपच फायदेशीर ठरणार आहे.


सरकारद्वारा गठीत करण्यात आलेल्या ऑलिम्पिक समितीने अॅथलिट्सला स्टायपेंड देण्यात यावं अशी शिफारस केली होती. ही शिफारस क्रीडा मंत्रालयाने स्विकारली आहे. त्यानंतर शुक्रवारी हा भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे.



सरकारने टॉप योजने अंतर्गत १५२ खेळाडूंना निवडले होते. या सर्व १५२ खेळाडूंना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम सप्टेंबर २०१७ पासून लागू करण्यात आली आहे.