श्रीसंतला या देशात जाऊन खेळायचंय क्रिकेट
स्कॉटलंडच्या ग्लेन्रोथ्स क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयनं परवानगी द्यावी
कोच्ची : स्कॉटलंडच्या ग्लेन्रोथ्स क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयनं परवानगी द्यावी, या मागणीसाठी भारताचा क्रिकेटपटू एस. श्रीसंत केरळ उच्च न्यायालयात गेला आहे. ग्लेन्रोथ्स क्रिकेट क्लबला १० ऑगस्टला श्रीसंतनं पत्र लिहीलं आहे. क्लबमधून क्रिकेट खेळण्यासाठी ताबडतोब परवानगी द्यावी अशी मागणी बीसीसीआयकडे केल्याचं श्रीसंतनं या पत्रात म्हणलं आहे.
बीसीसीआयकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे श्रीसंतनं केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्कॉटलंडमधली ही प्रिमिअर लिग ९ सप्टेंबर किंवा त्याआधी संपणार असल्याचं श्रीसंतनं दाखल केलेल्या या याचिकेमध्ये म्हणलं आहे.
श्रीसंतला सात ऑगस्टला केरळ उच्च न्यायालयानं दिलासा दिला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं श्रीसंतवर घातलेली आजीवन बंदी उच्च न्यायालयानं उठवली होती. आयपीएलच्या सहाव्या सिझनवेळी २०१३ स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून श्रीसंतवर बीसीसीआयनं बंदी घातली होती. १६ मे २०१३ साली श्रीसंतबरोबरच राजस्थान रॉयल्सच्या अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये या खेळाडूंसोबतच आणखी ३९ जणांना आरोपी बनवण्यात आलं. या सगळ्यांनी फक्त सट्टेबाजी नाही तर स्पॉट फिक्सिंगही केल्याचा दावा दिल्लीचे माजी पोलीस कमिशनर नीरज कुमार यांनी केला होता. यानंतर १० जून २०१३ला श्रीसंत, चंडीला आणि चव्हाणला जामीन देण्यात आला.
२५ जून २०१५साली पटियाला हाऊस कोर्टानं ठोस पुरावे नसल्यामुळे या तिघांचीही मुक्तता केली. तरीही बीसीसीआयनं श्रीसंतवरची बंदी कायम ठेवली. यानंतर श्रीसंतनं उच्च न्यायालयात धाव घेतली.