मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमातल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाला. यानंतर आता दुसऱ्या मॅचआधी मुंबईसाठी एक खुशखबर आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने लसिथ मलिंगाला संपूर्ण आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळण्याची परवानगी दिली आहे. याआधी वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मलिंगाला स्थानिक क्रिकेट खेळणं बंधनकारक केलं होतं. यानंतर मलिंगाने आयपीएलमध्ये सुरुवातीच्या ६ मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिंगाच्या या निर्णयानंतर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला विनंती केली की मलिंगाला जेवढा वेळ आयपीएलमध्ये खेळणं शक्य होईल तेवढा वेळ देण्यात यावा. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही विनंती स्वीकारली. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिकृत माहिती देऊन सांगितलं की मलिंगाला संपूर्ण आयपीएल खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.


'मलिंगाला स्थानिक क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेण्यापासून मुक्त करण्यात येत आहे. यामुळे मलिंगाला आयपीएल खेळता येईल. आयपीएलमध्ये मजबूत प्रतिस्पर्धी टीममधल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध मलिंगाला खेळण्याची संधी मिळेल', असं वक्तव्य श्रीलंका क्रिकेट बोर्डकडून करण्यात आलं. 


श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे मलिंगा मुंबईच्या गुरुवारी होणाऱ्या बंगळुरूविरुद्धच्या मॅचसाठी उपलब्ध असेल. असं असलं तरी मलिंगाने श्रीलंकेच्या स्थानिक वनडे स्पर्धेमध्ये भाग घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत आपण मुंबईच्या टीमशी सल्लामसलत करणार असल्याचं मलिंगाने इएसपीएनक्रिकइन्फोला सांगितलं.


श्रीलंकेमधली ही स्थानिक वनडे स्पर्धा ४ एप्रिल ते ११ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता आहे. पण याचं वेळापत्रक श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अजून जाहिर केलेलं नाही.


आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर मलिंगा म्हणाला, 'आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल मी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला धन्यवाद देतो. पण श्रीलंकेच्या वनडे टीमचा कर्णधार म्हणून स्थानिक वनडे स्पर्धा खेळणं मला महत्त्वाचं वाटतं. यामुळे श्रीलंकेमधले तरुण खेळाडू कसं खेळतायत हे मी मैदानात पाहू शकतो. यासाठी मी मुंबईच्या टीमशी बोलणार आहे.'


श्रीलंकेतल्या स्थानिक वनडे स्पर्धेसाठी मलिंगा परत गेला आणि त्याची गेल ही टीम फायनलमध्ये पोहोचली तर त्याला आयपीएलमधल्या जास्तीत जास्त ३ मॅचना मुकावं लागू शकतं. स्थानिक वनडे स्पर्धा खेळण्याचा मलिंगाचा निर्णय निश्चित झाला तर तो ३ एप्रिलला चेन्नईविरुद्धची मॅच खेळून श्रीलंकेला रवाना होईल.