कोलंबो : श्रीलंकेचा स्पिनर अकिला धनंजयावर आयसीसीने एका वर्षाची बंदी घातली आहे. धनंजयाची बॉलिंग ऍक्शन बेकायदेशीर असल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अकिला धनंजया हा ऑफ स्पिन, लेग स्पिन आणि कॅरम बॉल टाकणाऱ्या ठराविक बॉलरपैकी एक आहे. २५ वर्षांच्या धनंजयाने श्रीलंकेसाठी ६४ मॅचमध्ये १०६ विकेट घेतल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये धनंजयाने ६ विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं. याच मॅचमध्ये धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद असल्याचं आयसीसीला सांगण्यात आलं. याच कारणामुळे धनंजया सीरिजची दुसरी टेस्ट खेळू शकला नाही.


आयसीसीकडे धनंजयाच्या बॉलिंग ऍक्शनची तक्रार करण्यात आल्यानंतर त्याला चेन्नईला पाठवून बॉलिंग ऍक्शनची तपासणी करण्यात आली. या तपासणीत धनंजयाच्या बॉलिंग ऍक्शनमध्ये दोष असल्याचं आढळून आलं.


याआधी मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही बॉलिंग ऍक्शनमुळे धनंजयावर बंदी घालण्यात आली होती. आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही बॉलरचं वर्षात दोनदा निलंबन होत असेल तर त्याच्यावर एक वर्षाची बंदी आपोआप लागते.


या कारवाईमुळे अकिला धनंजया पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपला मुकणार आहे. धनंजयाने श्रीलंकेसाटी ३६ वनडेमध्ये ५१ विकेट, २२ टी-२०मध्ये २२ विकेट आणि ६ टेस्टमध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत.