श्रीकांतने रचला इतिहास, उपांत्य फेरीत भारताच्याच लक्ष्य सेनचा पराभव
भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
मुंबई : भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रीकांतने शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा 17-21, 21-14, 21-17 असा पराभव केला. दोन्ही भारतीय खेळाडूंमधील हा रोमांचक सामना 69 मिनिटं चालला.
आता अंतिम फेरीत 12व्या मानांकित श्रीकांतचा सामना अँडर अँटोन्सन (डेन्मार्क) आणि कीन येव लोह (सिंगापूर) यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे.
जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. किदाम्बी श्रीकांत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. 1983 मध्ये प्रकाश पदुकोणचे कांस्य हे जागतिक स्पर्धेत भारताचे पहिलं पदक होतं. यानंतर, 2019 मध्ये बी साई प्रणीतने कांस्यपदक जिंकलं होतं.
पहिल्या गेमच्या सुरुवातीला लक्ष्य सेनने 11-8 अशी आघाडी घेतली होती. खेळाच्या मध्यांतरानंतर श्रीकांतने पुनरागमन करत 17-16 अशी आघाडी घेतली. यानंतर भारतीय युवा खेळाडूने सलग पाच पॉईंट्स जमा करत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर श्रीकांतने मध्यंतराला 11-9 अशी आघाडी घेतली. श्रीकांतने ही आघाडी कायम राखत दुसरा गेम 21 मिनिटांत जिंकला.
28 वर्षीय श्रीकांतने 26 मिनिटं चाललेल्या सामन्यात नेदरलँडच्या मार्क कलजाऊचा 21-8, 21-7 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्याचवेळी 20 वर्षीय लक्ष्य सेनने 67 मिनिटं चाललेल्या सामन्यात चीनच्या जून पेंग झोऊचा 21-15, 15-21, 22-20 असा पराभव करत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.