Stampede in Football Match : मध्य अमेरिकेतील (Central America) एल साल्वाडोरमध्ये (El Salvador Football Stadium) फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी (Stampede) झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 500 हून अधिक लोक जखमी झाले.  एल साल्वाडोरमध्ये कुस्कॅटलान स्टेडियममध्ये स्थानिक फुटबॉल संघ अलियान्झा आणि सांता आना एफएएस यांच्यात सामना होता. अलियान्झा आणि सांता आना एफएएस हे साल्वाडोरमधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहेत. त्यांचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमच्या गेटवर मोठी गर्दी झाली होती. काही लोक जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि नऊ लोकांना जीव गमवावा लागला आहे.
 
दोन्ही संघांची मोठ्या प्रमाणात चाहते असल्याने या सामन्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. दरम्यान, काही लोकांनी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये गुदमरल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला.  तर सुमारे 500 लोक जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना सुरू झाल्यानंतर 16 मिनिटांनी काही लोकांनी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली. "सात पुरुष आणि दोन महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही 500 जणांना वाचवले आहे. 100 हून अधिक लोकांवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सामना सुरू झाल्यानंतर सुमारे 16 मिनिटांनी हा अपघात झाला. त्यानंतर हा सामना थांबवण्यात आला होता," अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.


एल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, असा इशारा राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी दिला.


याआधीही घडल्यात भीषण घटना...


यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या अपघातात 127 जणांना जीव गमवावा लागला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते. 34 लोकांचा तर स्टेडियममध्येच मृत्यू झाला होता. तर इतर लोकांनी रुग्णालयात जीव गमावला. दुसरी घटना  24 मे 1964 रोजी पेरूची राजधानी लिमा येथे पेरू आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान घडली होती. सामन्यादरम्यान रेफरीच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या 2 चाहते मैदानात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी कारवाई केल्यावर मैदानात असलेले प्रेक्षक संतप्त झाले आणि त्यांनी हिंसाचार सुरु केला. यावेळी मैदानात 50 हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. या घटनेत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.