मुंबई : विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यामध्ये सर्वोत्तम कोण याबद्दल नेहमीच चर्चा होते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. स्टिव्ह स्मिथ सध्या क्रिकेट खेळत नाही. त्यामुळे सध्या विराट कोहली हाच सर्वोत्तम आहे. पण स्मिथ खेळत असता तर मी स्मिथ सर्वोत्तम असल्याचं सांगितलं असतं, असं पाँटिंग म्हणाला. मागच्या तीन ते चार वर्षांमध्ये स्मिथनं ऑस्ट्रेलियासाठी केलेली कामगिरी सर्वोत्तम आहे. अॅशेसमध्ये स्मिथची बॅटिंगही शानदार होती. विराट कोहली मात्र वनडेमध्ये आक्रमक बॅटिंग करतो. कसोटी क्रिकेटमधल्या पाटा खेळपट्टीवर विराट खोऱ्यानं रन करतो. पण उसळणारी खेळपट्टी असेल तर मात्र विराट बावचळतो. स्मिथनं मात्र सगळ्या प्रकारच्या वातावरणात खेळण्याचं कौशल्य दाखवलं आहे, असं मत पाँटिंगनं व्यक्त केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून होणारी ही वक्तव्य म्हणजे विराट कोहलीला डिवचण्याचाच प्रयत्न असल्याचं म्हणावं लागेल. काहीच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स यानंही असंच वक्तव्य केलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी आम्ही विराटला एकही शतक करु देणार नाही, असं कमिन्स म्हणाला होता.


यावर्षीच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव स्मिथवर वर्षभराची बंदी घालण्यात आली. स्मिथबरोबरच डेव्हिड वॉर्नरचंही वर्षभरासाठी निलंबन झालं. या वर्षाच्या शेवटी भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्येही स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये नसतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मैदानात इतिहास घडवण्याची संधी भारतीय टीमला असणार आहे.