सलग चार दिवस रडला होता स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ बॉल टेम्परिंग प्रकरणानंत तब्बल चार दिवस सतत रडला होता. हा खुलासा खुद्द स्मिथने केलाय.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ बॉल टेम्परिंग प्रकरणानंत तब्बल चार दिवस सतत रडला होता. हा खुलासा खुद्द स्मिथने केलाय. स्मिथ आणि वॉर्नरने कॅमेरुन बेनक्रॉफ्टच्या साथीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये बॉल कुरतडला होता. स्मिथने सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर चार दिवस तो रडत होता. आता वॉर्नर आणि स्मिथ ग्लोबल टी-२० कॅनडा लीगद्वारे मैदानात पुनरागमन करणार आहे. स्मिथ म्हणाला, इमानदारीने सांगायचे तर तब्बल चार दिवस मी रडत होतो. त्यादरम्यान मानसिकरित्या खूप संघर्ष केला. मात्र मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझे चांगले मित्र आणि कुटुंबातील सदस्यांनी माझ्यावर लक्ष ठेवले. या कठीण परिस्थितीत ज्यांनी मला साथ दिली त्यांच्याप्रती आदर अधिक वाढलाय.
केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये स्मिथ आणि वॉर्नरच्या सांगण्यावरुन बेनक्राफ्टने बॉल कुरतडला होता. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली होती. यानंतर स्मिथ आणि वॉर्नरवर प्रत्येकी एका वर्षासाठी बंदी घातली तर बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये. मात्र आता वॉर्नर आणि स्मिथ टी-२० लीगद्वारे मैदानात पुन्हा खेळताना दिसणार आहेत.
ग्लोबल टी-२० कॅनडा लीगमध्ये स्मिथ टोरँटो नॅशनल्सकडून खेळताना दिसणार आहे. या संघात स्मिथशिवाय अनेक क्रिकेटर खेळताना दिसणार आहेत.