तुमसे ना हो पाया...; रोनाल्डोची नक्कल करणाऱ्या वॉर्नरची अशी फजिती
ऑस्ट्रेलियाच्या विजयासोबत डेव्हिड वॉर्नरच्या एक कृत्याची देखील चर्चा होतेय.
दुबई : डेव्हिड वॉर्नरच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने T-20 वर्ल्डकप 2021च्या सुपर 12 सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्स राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा विजय आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार अरोन फिंचने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 6 बाद 154 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने 17 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून लक्ष्य गाठलं. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या विजयासोबत डेव्हिड वॉर्नरच्या एक कृत्याची देखील चर्चा होतेय.
सामना जिंकल्यानंतर वॉर्नरने प्रेस कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. यावेळी वॉर्नरने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे एक प्रयत्न केला. त्याने टेबलासमोर ठेवलेली कोल्डड्रिंकची बाटली काढून टाकली. काही दिवसांपूर्वी युरो कप 2020च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोनाल्डोनेही याच कंपनीच्या कोल्डड्रिंकची बाटली काढून पाण्याची बाटली हातात घेऊन सर्वांना पाणी पिण्याचं आवाहन केले होते. यामुळे त्या कंपनीचे मोठे नुकसान झालेलं.
स्पॉन्सरशिपमुळे वॉर्नरला बाटली परत ठेवावी लागली
वॉर्नरने देखील रोनाल्डोप्रमाणेच बाटली बाजूवा ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु बाटली काढून टाकल्यानंतर एका अधिकाऱ्याने त्याला स्पॉन्सरशिपमुळे बाटल्या पुन्हा समोर ठेवण्यास सांगितलं. वॉर्नरनेही अधिकाऱ्यांची आज्ञा पाळली आणि लगेचच बाटल्या टेबलावर ठेवल्या.
मागील काही काळ वॉर्नरसाठी कठीण काळ होता. आयपीएल 2021 दरम्यान, त्याने प्रथम सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद गमावलं आणि त्यानंतर तो संघाबाहेरही गेला. इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या अर्धशतकामुळे त्याचा आत्मविश्वास खूप वाढला आहे.