मुंबई : मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर २३ डिसेंबरला क्रिकेटप्रेमींना एक अनोखी मेजवानी मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे माजी महान क्रिकेटर सुनिल गावसकर आणि अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली, शिवाजी पार्कवर संध्याकाळी चार वाजता एक लढत रंगणार आहे.


शिवाजी पार्कनं आयोजित केलेल्या या लढतीत माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, संजय मांजरेकर, पद्माकर शिवलकर हे मातब्बर खेळाडूही सहभागी होणार आहेत. तर वासू परांजपे, माधव आपटेंसारखे सत्तरी ओलांडलेले माजी क्रिकेटरही या सामन्याची रंगत अनुभवण्यासाठी हजेरी लावणार आहेत.


मुंबई क्रिकेटच्या इतिहासात दादर युनियन आणि शिवाजी पार्क हे दोन क्लब परस्परांचे कडवे प्रतिस्पर्धी होते. त्यांच्यात नेहमीच कडवी लढत पाहायला मिळत असे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हीच रंगत क्रिकेटप्रेमींना पुन्हा अनुभवता यावी यासाठीच, २३ डिसेंबरला या लढतीचं आयोजन करण्यात आलंय.


ही लढत प्रत्येकी सहा ओव्हर्सची खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातून जुन्या आठवणींना उजळाही देण्यात येणार आहे.