`अम्पायर काय नुसते पाहत बसलेत`, सुनील गावसकर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर संतापले; `रोहित शर्मा सांगूनही...`
सॅम कोन्स्टास (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लॅबुशॅने (72), स्टीव्ह स्मिथ (68) यांनी अर्धशतकं झळकावली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा तीन बळी घेऊन भारताचा तारणहार ठरला.
बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेच्या चौथा सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व राखलं. सॅम कोन्स्टास (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लॅबुशॅन (72), स्टीव्ह स्मिथ (68) यांनी अर्धशतकं झळकावली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा तीन बळी घेऊन भारताचा तारणहार ठरला आणि भारतीय संघाचं सामन्यात पुनरागमन केलं. पदार्पण करणारा सॅम कोन्स्टास (60) याने भारतीय गोलंदाजांनी सहजपणे हाताळत सर्वांना प्रभावित केलं.
या सामन्यादरम्यान समालोचन करणारे सुनील गावसकर आणि इरफान पठाण चांगलेच संतापलेले दिसले. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धाव घेताना खेळपट्टीवर धावत होते यामुळे दोघेही चिडले होते. यावेळी त्यांनी अम्पायर्सवर आपला संताप व्यक्त केला. भारतीय कर्णधार रोहित शर्माही यावेली मार्नस लॅबुशॅनला चेतावणी देताना दिसत होता. यावेळी इरफान पठाण आणि सुनील गावसकर यांच्यात नेमकं काय संभाषण झालं हे जाणून घ्या.
इरफान पठाण: रोहित शर्मा मार्नस लॅबुशेनला सांगत आहे, जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर धावत असता तेव्हा तुम्ही ते स्ट्रिपच्या मध्यभागी करत असता
सुनील गावस्कर: अगदी सॅम कॉन्स्टास. तो सरळ खेळपट्टीवर धावत होता. त्याला कोणीही काही सांगितले नाही
इरफान पठाण: हे अम्पायर्सचं काम आहे.
सुनील गावसकर: अम्पायर्स फक्त बघत आहेत. रोहित आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात जी चर्चा सुरू आहे, अम्पायर्स फक्त बघत आहेत."
विराट कोहली - सॅम कोन्स्टास यांच्या वादाने वेधलं लक्ष
ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोस्टासने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. 19 वर्षीय सॅम हा चौथा सर्वात कमी वयात पदार्पण करणार ऑस्ट्रेलियन खेळाडू असल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र यावेळी एका अन्य कारणामुळेही तो चर्चेत आला. ते म्हणजे विराट कोहलीबरोबर मैदानात झालेली त्याची बाचाबाची!
नवव्या षटकात खांद्याला खांदा लागला असता दोघांनी रागात एकमेकांकडे वळून पाहिलं. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमकदेखील झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराट कोहलीची चूक असल्याचं सांगितलं. याप्रकरणी आयसीसीने विराट कोहलीवर बंदी घातली नसली तरी मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे. यानंतर आता रवी शास्त्री यांनी आपलं मत मांडताना विराट कोहलीच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीने रवी शास्त्री प्रशिक्षकपदी असताना सर्वाधिक काळ संघाचं नेतृत्व केलं आहे.
आयसीसीने विराटची कृती हा लेव्हल 1 गुन्हा मानला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तोच दंड मोहम्मद सिराजला ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यानंतर केलेल्या कृतीबद्दल ठोठावण्यात आला होता.
चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने धक्का देणं या एकमेक कृतीने लक्ष वेधलं नाही. स्टम्प माईकमध्ये विराट कोहली मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी हसून बोलू नको असं सांगताना कैद झाला आहे. दरम्यान पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावत 311 धावा केल्या आहेत.