एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची विजयाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. 210 धावांचा पाठलाग करताना अष्टपैलू मिशेल मार्शने आपल्या दमदार खेळीने संघाला विजय मिळवून दिला. मिशेल मार्शने 51 चेंडूत 55 धावा ठोकल्या. मिशेल मार्शने ठोकलेल्या दमदार अर्धशतकामुळे सध्या अत्यंत खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघात जीव ओतला आहे. सामन्यानंतर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी मिशेल मार्शशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मिशेल मार्शला वडील तुला काही कोचिंग देतात की नाही असं विचारला असता त्यानेही मजेशीर उत्तर दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील गावसकर हे मिशेल मार्शचे वडील गेओफ मार्श यांच्यासह खेळले आहेत. सुनील गावसकर यांनी मिशेल मार्शच्या स्ट्राइक रेटचा उल्लेख करत त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. मिशेल मार्श आणि त्याच्या वडिलांच्या खेळण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे असं सांगत गावसकरांनी त्याला प्रश्न विचारला. यावर त्याने आपण आपल्या वडिलांचा खराब स्ट्राइक रेट सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचं उत्तर दिलं. 


"तुला वडिलांनी असं खेळायला अजिबात शिकवलं नाही का? (गावसकर डिफेन्स शॉट दाखवत). कारण तू फक्त बँग, बँग मारत सुटतोस," अशी विचारणा सुनील गावसकर यांनी केली. यावर मार्श म्हणतो की, "मी फक्त माझ्या वडिलांचा खराब स्ट्राइक रेट सुधारण्याचा प्रयत्न करत आहे".



दरम्यान मिशेल मार्शने श्रीलंकेविरोधात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकपमधील आव्हान कायम राहिलं आहे. 


"आमच्यासाठी हा फारच चांगला दिवस होता. धीमी सुरुवात मिळाल्यानंतर आम्ही फार दबावात होतो. पण आमचे अनुभवी खेळाडू संघासाठी उभे राहिले. काही सामन्यात (दक्षिण आफ्रिकेविरोधात) पराभव झाल्यानंतर आम्हाला फार वेदना झाल्या होत्या. कदाचित आम्हाला योग्य मार्गावर नेणारी ती पायरी होती. माझ्या वडिलांच्या स्ट्राइक रेटसाठी मी हे करत आहेत. माझ्या मते मी आज चांगली फलंदाजी केली," असं मिशेल मार्श म्हणाला.


"आमचे खेळाडू फारच संयमी होते आणि आम्ही फार चांगल्या पद्धतीने शेवट केला. मी एक ओव्हर टाकली, पण नंतर मात्र संधी मिळाली नाही. आमच्याकडे झम्पा, मॅक्सवेल, स्टोइन आणि मी असे अनेक पर्याय आहे. कमिन्स ज्याप्रकारे गोलंदाजी करतो आणि त्यात बदल करतो ते जबरदस्त आहे. इंगलीस हा योद्धा असून, त्याला स्पर्धा आवडते. तो फिरकी चांगला खेळतो. त्याच्याकडे ताकद आहे. त्याच्या मोठ्या करिअरची ही सुरुवात आहे अशी आशा आहे," असं मिशेल मार्शने म्हटलं.