India vs Bangladesh: बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने दोन दिवस वाया घालवल्यानंतरही भारतीय संघाने फक्त अडीच दिवसात सामना जिंकत कमाल केली आहे. या विजयासह रोहित शर्माची (Rohit Sharma) गणना भारताच्या महान कर्णधारांमध्ये केली जात आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आपली रणनीती, धोरणं, कौशल्य सर्व काही सिद्ध केलं आहे. भारताने चौथ्या दिवसापासून आक्रमक खेळी करत दुसऱ्या कसोटी सामन्यासह मालिकाही 2-0 ने जिंकली. दरम्यान पाचव्या दिवशी रोहित शर्माने बांगलादेशचा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज मोमिनुल हकसाठी (Mominul Haque) चक्रव्यूह रचला होता. यावेळी समालोचन करणारे सुनील गावसकरही ही रणनिती पाहून प्रभावित झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने मोमिनुल फलंदाजी करत असताना एक खेळाडू लेग-स्लिपला ठेवला होता. बांगलादेशचा फलंदाज दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन विरुद्ध चांगला खेळत होता. लेग-स्लिपला केएल राहुल होता ज्याने अश्विनच्या गोलंदाजीवर कोणतीही चूक न करता मोमिनुलचा झेल घेत त्याला तंबूत धाडलं. मोमिनुलच्या विकेटचं श्रेय अश्विन आणि राहुल दोघांनाही मिळत असताना गावसकर मात्र रोहितच्या कर्णधारपदावर खूप प्रभावित झाले होते.


सुनील गावसकर म्हणाले की, "रोहित शर्माकडून सर्वोत्तम नेतृत्व. मोमिनुलसारखा फलंदाज जो फार स्वीप शॉट खेळतो त्याच्यासाठी लेग स्लिपला खेळाडू ठेवल्याबद्दल सर्व श्रेय त्याला द्यायला  हवं".


कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारताने बांगलादेशविरोधातील मालिका 2-0 जिंकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) क्रमवारीत आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. 7 गडी राखून विजय मिळवत भारताने त्यांच्या गुणांची टक्केवारी प्रभावी 74.24 इतकी सुधारली तर बांगलादेशच्या पराभवामुळे ते 34.38 टक्क्यांसह सातव्या स्थानावर घसरले. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला मागे टाकण्यात आलं आहे, जे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.


पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही भारताने धडाकेबाज फलंदाजी करत दुसरा कसोटी सामना जिंकला. फक्त अडीच दिवसात भारताने या सामन्याचा निकाल लावला. भारतीय फलंदाजांनी टी-20 प्रमाणे फलंदाजी केली. यशस्वी जैस्वाल (51 चेंडूत 72) आणि केएल राहुल (43 चेंडूत 68) यांच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद संघ धावसंख्या उभारली. 34.4 षटकांमध्ये, भारताने कसोटी इतिहासातील सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावा केल्या. भारताने 285/9 वर डाव घोषित केला आणि पहिल्या डावात 52 धावांची आघाडी घेतली.


चौथ्या दिवशी उशिरा बांगलादेश संघ फलंदाजीसाठी उतरला असताना संकटात सापडला. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या षटकांमध्ये दोन विकेट्स घेतले. रवींद्र जाडेजा आणि बुमराहनेही बांगलादेशी फलंदाजांना तंबूत धाडलं आणि 146 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. यानंतर भारताला सामना जिंकण्यासाठी 96 धावांची गरज होती. 


कमी धावांचं लक्ष्य असतानाही भारताने अंतिम क्षणी धडाकेबाज फलंदाजी केली. जैसवालने अवघ्या 43 चेंडूत अर्धशतक झळकावले. 51 धावांवर बाद झाल्यानंतर, विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारली आणि ऋषभ पंतच्या बरोबरीने खेळ पूर्ण केला.