वर्ल्ड कप टीममध्ये जडेजाऐवजी विजय शंकरला संधी द्या- गावसकर
इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमचे जवळपास सगळे खेळाडू ठरले आहेत.
मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमचे जवळपास सगळे खेळाडू ठरले आहेत. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपसाठी त्यांची संभाव्य टीम निश्चितही केली आहे. पण भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी वर्ल्ड कपच्या टीममध्ये एका वेगळ्याच नावाचं समर्थन केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडेनंतर बोलताना गावसकर यांनी भारताच्या वर्ल्ड कपसाठीच्या संभाव्य टीमवर चर्चा केली.
ऑलराऊंडरबद्दल सांगताना सुनील गावसकर यांनी भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्या आणि विजय शंकर या दोघांच्या नावाला पसंती दिली. हार्दिक पांड्याचं स्थान तर वर्ल्ड कप टीममध्ये निश्चित आहे, मग विजय शंकरला कोणाच्या बदली संधी देणार? असा प्रश्न गावसकर यांना विचारण्यात आला. तेव्हा रवींद्र जडेजाऐवजी विजय शंकरची वर्ल्ड कप टीममध्ये निवड व्हावी, असं उत्तर गावसकर यांनी दिलं.
सुनील गावसकर स्टार स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना म्हणाले, 'भारतीय टीममध्ये सध्या कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे दोन स्पिनर आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये स्पिन बॉलिंग करणाऱ्या ऑलराऊंडरऐवजी सीम बॉलिंग ऑलराऊंडरची गरज आहे. त्यामुळे हार्दिक पांड्यासोबत विजय शंकरला संधी द्यावी. दोन स्पिनर टीममध्ये असल्यामुले रवींद्र जडेजाला बाहेर बसवलं जाऊ शकतं'.
२८ वर्षाच्या विजय शंकरनं यावर्षी १८ जानेवारीला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीच्या तिन्ही मॅचमध्ये विजय शंकरला बॅटिंगची संधी मिळाली नाही. तामीळनाडूच्या या ऑलराऊंडरला भारताकडून बॅटिंग करण्याची संधी न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडेवेळी मिळाली. या मॅचमध्ये शंकरनं ४५ रन केले. आत्तापर्यंत खेळलेल्या ४ वनडेमध्ये विजय शंकरनं १६ ओव्हरमध्ये ४.८७ च्या इकोनॉमी रेटनं ७८ रन दिले आहेत. अजूनपर्यंत त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.
३० वर्षांचा रवींद्र जडेजा भारतासाठी १० वर्ष खेळतोय. जडेजानं आत्तापर्यंत १४७ वनडे, ४१ टेस्ट आणि ४० टी-२० मॅच खेळल्या आहेत. जडेजानं १४७ वनडेमध्ये १९९० रन केल्या आहेत आणि १७१ विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १४८५ रन आणि १९२ विकेट आहेत. तर टी-२० मॅचमध्ये जडेजानं ११६ रन केल्या आहेत आणि ३१ विकेट घेतल्या आहेत. जडेजा हा भारतीय टीममधला सर्वोत्तम फिल्डर समजला जातो. ही त्याची जमेची बाजू आहे. जडेजा फिल्डिंगमध्ये रनच वाचवत नाही, तर अनेकवेळा शानदार कॅच पकडून किंवा रन आऊट करून भारताला विकेटही मिळवून देतो.