दिल्ली : ऋषभ पंतला ट्रोल करणाऱ्यांना अभिनेता सुनील शेट्टीने चांगलेच सुनावले आहे. सुनीलने याबद्दल ट्विट करुन ऋषभचे समर्थन केले आहे. 'ऋषभ आता २१ वर्षांचा आहे. तो टी-२०, वनडे आणि टेस्ट अशा तिन्ही प्रकारात खेळतो. पंतला त्याच्या एका खेळीवरुन ट्रोल करणाऱ्यांनी स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. आपण २१ वर्षांचे असताना कुठे होतो? काय करत होतो? ऋषभ चांगला खेळतो आहे. त्याला सुधारणेसाठी एक संधी द्यायला हवी. पंत हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने आपल्या कामगिरीवर लक्ष द्यावे.' असे सुनील शेट्टी ट्विट मध्ये म्हणाला. 



 


नेटकऱ्यांचे समर्थन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सुनील शेट्टीने ऋषभ पंतसाठी धावून आला. सुनिल शेटट्टीच्या या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. ऋषभ पंतला एका चुकीवरुन पारखणे घाईचे ठरेल. तो युवा खेळाडू आहे. त्याची ही सुरुवात आहे. त्याला त्याची चूक सुधारण्यासाठी वेळ द्यायला हवा, अशी भूमिका काही नेटकऱ्यांनी घेतली आहे.


धोनीने जेव्हा क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते तेव्हा त्याच्याकडून देखील चुका झाल्या होत्या. खेळाचा अनुभव येत नाही, तोपर्यंत कोणालाच कसे खेळायचे हे समजत नाही. धोनी महान आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. आम्ही धोनीनंतर पंतलाच त्याचा शिलेदार मानतो. धोनीच्या अनुपस्थितीत आपल्याला चांगल्या विकेटकीपरची गरज असेल. आम्ही पंतला चांगल्या किपरच्या भूमिकेत पाहत आहोत, अशा प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंगवर व्यक्त झाल्या. 


का केले ट्रोल ?


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडेसाठी धोनीला आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे धोनीऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात आली. वर्ल्ड कपसाठीच्या टीममधील प्रवेशासाठी पंतची ही चाचणी होती.


भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३५९ रनचे आव्हान देऊन देखील पराभवाला सामोरे जावे लागले. या मॅचदरम्यान शिखर धवन आणि केदार जाधव या दोघांनी निर्णायक क्षणी एश्टॅन टर्नरचे कॅच सोडले. तसेच या मॅचमध्ये विकेटकीपर ऋषभ पंतने देखील काही चुका केल्या. त्या चूका भारताला महागात पडल्या. पंतने दोन स्टम्पिंग आणि एक कॅच घेण्याची संधी गमावली. धोनीचे अनुकरण करण्याच्या नादात पंतने रन आऊटची संधी देखील सोडली, तसेच अतिरिक्त रनही दिल्या. यामुळे त्याला समाज माध्यमांद्वारे चांगलेच ट्रोल करण्यात आले. 


एश्टन टर्नर आणि पीटर हॅन्डस्कॉम्ब या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला चौथ्या मॅचमध्ये विजय मिळवता आला. पंतने ३९ व्या ओव्हरमध्ये पीटर हॅन्डस्कॉम्बला आऊट करण्याची संधी गमावली. तसेच ४४ ओव्हरमध्ये पंतने चहलच्या बॉलिंगवर मोक्याच्या वेळी फटकेबाजी करत असलेल्या एश्टन टर्नरला आऊट करण्याची संधी सोडली. याचवेळी पंतने धोनी स्टाईलने विकेट घेण्याच्या नादात अधिक धाव पण दिली. या मॅचमध्ये पंतने बॅटिंग करताना २४ बॉलमध्ये ३६ रनची खेळी केली.