धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा
टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली
मुंबई : टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यापाठोपाठ लगेचच धोनीचा खास मित्र आणि त्याचा आयपीएलच्या चेन्नईच्या टीममधला सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती घेतली आहे. धोनीला शुभेच्छा देताना सुरेश रैनानेही त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. 'तुझ्याबरोबर खेळताना खूप आनंद मिळाला. मला तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे. याप्रवासात मीही तुझी साथ द्यायला आलो आहे. धन्यवाद भारत, जय हिंद', अशी इन्स्टाग्राम पोस्ट रैनाने शेयर केली आहे.
सुरेश रैनाने २२६ वनडेमध्ये ३५.३१ च्या सरासरीने ५,६१५ रन केले. यामध्ये ५ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश होता. तर ७८ टी-२० मॅचमध्ये रैनाने २९.१६ च्या सरासरीने १,६०४ रन केले. रैनाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र रैनाला फारसं यश मिळालं नाही. १८ टेस्टमध्ये त्याने २६.४८ च्या सरासरीने ७६८ रन केले, ज्यात १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश होता. आपल्या पदार्पणाच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येच रैनाने शतक केलं होतं.
३० जुलै २००५ साली रैनाने श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर १७ जुलै २०१८ला रैना शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. २०११ साली भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये रैना होता. भारताच्या सर्वोत्तम फिल्डर पैकी एक म्हणूनही रैनाने ओळख मिळवली होती.