सुरेश रैनाचा विक्रम, टी-२०मध्ये ८ हजार रन करणारा पहिला भारतीय
भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानं विक्रमाला गवसणी घातली आहे.
मुंबई : भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानं विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार रनचा टप्पा ओलांडणारा रैना हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पुदुच्चेरीविरुद्ध खेळताना रैनानं टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार रन पूर्ण केले. या मॅचआधी रैनानं ७,९८९ रन केले होते. त्यामुळे त्याला ८ हजार रन पूर्ण करण्यासाठी फक्त ११ रनची गरज होती.
३२ वर्षांच्या सुरेश रैनानं ३०० टी-२० मॅचमध्ये ३३.४७ च्या सरासरीनं ८,००१ रन केल्या आहेत. यामध्ये ४ शतकं आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली हा सर्वाधिक टी-२० रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट सुरेश रैनाच्या १७८ रन पिछाडीवर आहे. विराटनं २५१ मॅचमध्ये ७,८३३ रन केल्या आहेत. धोनी हा रैनानंतर ३०० टी-२० मॅच खेळणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना सहाव्या क्रमांकावर आहे. वेस्टइंडिजचा क्रिस गेल १२,२९८ रनसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा ब्रॅण्डन मॅक्कलम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं टी-२० क्रिकेटमध्ये ९,९२२ रन केले आहेत. कायरन पोलार्डनं ८,८३८ रन, शोएब मलिकनं ८,६०३ रन आणि डेव्हिड वॉर्नरनं ८,१११ रन केले आहेत.
रोहित शर्मानंतर टी-२० क्रिकेटमध्ये ३०० सिक्स मारणारा सुरेश रैना हा दुसरा भारतीय ठरला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीनंतर सुरेश रैना आता आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना दिसेल.