क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया
गेल्या काही महिन्यांपासून रैनाला गुडघ्याचा त्रास जाणवत होता.
मुंबई: भारताचा फलंदाज सुरेश रैना याच्या गुडघ्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. बीसीसीआयने ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रैनाला गुडघ्याचा त्रास जाणवत होता. याचे निदान करून रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर शुक्रवारी अॅमस्टरडम येथे ही शस्त्रक्रिया पार पडली.
ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. मात्र, त्याला आणखी ४ ते ६ आठवडे आराम करावा लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या शस्त्रक्रियेमुळे रैनाला आगामी काळात देशांतर्गत क्रिकेटपासूनही दूर राहावे लागणार आहे. रैना हा उत्तर प्रदेशच्या रणजी संघातून खेळतो. तर आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा भाग आहे.
फॉर्ममध्ये नसल्यामुळे रैना बराच काळ भारतीय संघातून बाहेर आहे. रैनाने १८ कसोटी सामने, २२६ एकदिवसीय सामने आणि ७० ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जुलै २०१८ मध्ये लॉर्डस येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात रैनाला भारताकडून खेळायची अखेरची संधी मिळाली होती.