Shreyas Iyerची सर्जरी यशस्वी; हॉस्पिटलमधील फोटो शेयर करत म्हणाला...
श्रेयस अय्यरला इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती.
मुंबई : टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)ला इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे श्रेयस आयपीएल 2021 च्या हंगामात खेळू शकणार नाही. आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. त्याची सर्जरी यशस्वी रित्या पार पडली आहे. श्रेयसने रूग्णालयातील एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना स्वतःच्या प्रकृती विषयी माहिती दिली. सध्या त्याचा सर्जरी नंतरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
श्रेयसने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्याने मैदानात उतरण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली. 'सर्जरी यशस्वी झाली आहे. लवकरच सिंहा प्रमाणे आणि दृढ संकल्पसोबत मैदानावर परतण्यासाठी तयार आहे.' असं श्रेयस ट्विट करत म्हणाला आहे. शिवाय त्याने लोकांनी दिलेल्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी आभार देखील मानले आहे.
23 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. इंग्लंडच्या डावातील 8व्या ओव्हरमध्ये जेव्हा श्रेयसने वेगवान गोलंदाज शर्दुल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेयरस्टोच्या एका शॉटला रोखण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा गंभीर इजा झाली. मात्र आता उपचारानंतर श्रेयसची प्रकृती उत्तम आहे.
यंदाच्या हंगामात श्रेयस आयपीएलचे सामने खेळू शकत नसला तरी त्याला त्याचं पूर्ण मानधन मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स त्याला पूर्ण पगार देणार आहे. श्रेयस दिल्लीच्या प्रत्येक सिझनसाठी 7 कोटी रूपयांचं मानधन स्वीकारतो. 'खेळाडू विमा योजने'च्या माध्यमातून पूर्ण रक्कम त्याला मिळणार आहे.