T20 World Cup : `गार्डन में घूमेगा तो.. पता है ना`, सूर्यकुमारने घेतली यशस्वी जयस्वालची फिरकी
Suryakumar Yadav on Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. अशातच सूर्याने यशस्वी जयस्वालच्या पोस्टवर भन्नाट कमेंट करत रोहित शर्माची आठवण करून दिली.
Suryakumar Yadav comment : वेस्ट इंडिज आणि युएस यांच्यात संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या आगामी क्रिकेटच्या महाकुंभासाठी (T20 World Cup) टीम इंडिया अमेरिकेला रवाना झाली आहे. आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता क्रिडाप्रेमी येत्या 2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची वाट पाहत आहेत. अशातच आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणारे टीम इंडियाचे खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून विराट कोहली मात्र अजूनही भारतातच आहे. अशातच आता सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) देखील पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळण्यासाठी अमेरिकेत पोहोचला आहे. त्यामुळे त्याने आनंदाच्या भरात एक फोटो शेअर केला होता. त्यावर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) भन्नाट कमेंट केली.
यशस्वी जयस्वाल जेव्हा अमेरिकेत पोहोचला तेव्हा त्याने एक फोटो शेअर केला अन् आपण टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचं सांगितलं. त्यावर सूर्यकुमार यादवने भन्नाट कमेंट केली. संभाल के गार्डन में घूमेगा तो.. पता है ना, अशी कमेंट सूर्यकुमार यादवने केली. त्यावर अनेकांना हसू आवरलं नाही. सूर्याच्या या कमेंटला 7 लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. तर हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिलीये.
टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल यांची जोडी सलामीला येणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वाल याला चांगली कामगिरी करता आली नाहीये. मात्र, तो यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करेल, अशा विश्वास व्यक्त केला जातोय. यशस्वीसाठी हा पहिला वर्ल्ड कप आहे, त्यामुळे आता त्याच्या फलंदाजीवर सर्वांचं लक्ष राहिल.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.