सुर्यकुमार यादवला ‘SKY’ नावं कोणी दिलं? तुम्ही `या` व्यक्तीची कल्पनाही केली नसेल!
सूर्यकुमारने आता खुलासा केला आहे की, त्याला हे नाव कसं आणि कोणी दिलं.
मुंबई : टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना इंडियन प्रीमियर लीगमुळे ओळख मिळाली. सूर्यकुमारचे टोपणनाव 'SKY' आहे. टीममधील साथीदार आणि चाहत्यांना देखील त्याचं हे नाव पसंत आहे. दरम्यान आता सूर्यकुमारने आता खुलासा केला आहे की, त्याला हे नाव कसं आणि कोणी दिलं.
सूर्यकुमारने 2012 मध्ये मुंबईकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. 2014 मध्ये केकेआरकडून खेळताना त्याने चांगला खेळ केला होता. तेव्हा कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर होता. त्याने सूर्यकुमारच्या प्रतिभेवर विश्वास दाखवला आणि भरपूर संधी दिल्या. कोलकात्याला दोनदा चॅम्पियन बनवणाऱ्या गौतम गंभीरने सूर्यकुमाराला SKY असं नाव दिलं.
ब्रेक फास्ट विथ चॅम्पियन्स या शोमध्ये सूर्यकुमार यादवने याचा खुलासा केला. सूर्यकुमार यादव म्हणाले, “जेव्हा मी 2014 मध्ये केकेआरमध्ये होतो, तेव्हा गौतम भाईने मला मागून दोन-तीन वेळा ‘स्काय’ म्हटलं होतं. मी लक्ष दिलं नाही. मग तो म्हणाला मी फक्त तुलाच हाक मारतोय. अरे तुझे इनिशियल्स तर बघ! मग मला कळलं की ते 'स्काय' आहे.
आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई टीमसाठी आतापर्यंतचा सिझन चांगला राहिला नाही. 8 पैकी 8 सामने गमावून गुणतालिकेत टीम शेवटच्या स्थानावर आहे. याशिवाय या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपवर सूर्यकुमार यादवची नजर असेल.