T20 WC: `तुझा रेषेला पाय लागला होता का?`, सूर्यकुमार यादव काय म्हणाला? अक्षर पटेलने केला खुलासा, `आधी तो...`
टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) घेतलेल्या झेलनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सूर्यकुमार यादवचा पाय सीमेला लागला होता असा दावा काहींनी केला होता. दरम्यान अक्षर पटेलने (Axar Patel) सूर्यकुमार यादवने या झेलसंबंधी काय सांगितलं होतं याचा खुलासा केला आहे.
Axar Patel on Suryakumar Yadav Catch: क्रिकेटमध्ये 'Catches win you matches' असं म्हटलं जातं. म्हणजेच उत्तम क्षेत्ररक्षण तुम्हाला सामने जिंकवण्यात मदत करतात. टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने याचा अनुभवही घेतला. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अखेरच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या या कॅचची तुलना अनेकांनी कपिल देव यांनी 1983 वर्ल्डकपमध्ये घेतलेल्या कॅचशी केली होती. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा (David Miller) फक्त झेल घेतला नाही तर त्याने वर्ल्डकप जिंकवला असं कौतुक चाहते करत आहेत. एकीकडे या झेलचं कौतुक होत असताना, काहींनी मात्र त्यावरुन संशय निर्माण केला होता. सूर्यकुमार यादवचा पाय सीमेला लागला असा दावा काहींनी केला होता. दरम्यान अक्षर पटेलने (Axar Patel) सूर्यकुमार यादवने या झेलसंबंधी काय सांगितलं होतं याचा खुलासा केला आहे.
टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ भिडले होते. दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज होती. 30 चेंडूत 30 धावांची गरज असताना भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकाच्या फलंदाजांना रोखलं आणि सामना अटीतटीचा केला. जसप्रीत बुमराह, अर्शदीप आणि हार्दिक पांड्या यांनी भारताला पुन्हा एकदा सामन्यात आणलं होतं.
अखेरच्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने मोठा फटका लगावला. चेंडू सीमेपार जात असतानाच सूर्यकुमार यादवने जबरदस्त झेल घेतला. पण यानंतर त्याचा पाय सीमेला लागला की नाही याबाबत साशंकता होती.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अक्षर पटेलने सांगितलं की, "मिलरने फटका लगावला तेव्हा मी मिड-विकेटला होतो. मला वाटलं की, ठीक आहे हा षटाकर जातोय. पण तितक्यात सूर्यकुमारने झेल घेतला. प्रत्येकजण त्याला तुढा पाय सीमेला लागला का? असं विचारत होतं. पण सूर्याला खात्री नव्हती. आधी त्याने मला खात्री आहे सांगितलं, पण काही सेकंदांनी मात्र खात्री नाही असं म्हणाला. मला थोडी शंका आहे असं तो म्हणत होता. जेव्हा आम्ही रिप्ले पाहिला तेव्हा 99 टक्के आपण वर्ल्डकप जिंकला आहे याची खात्री झाली. हा अत्यंत हाय-प्रेशर सामना होता आणि सूर्याने छान समतोल राखला होता".
याशिवाय सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात अक्षर पटेलने मिशेल मार्शचा असाच अफलातून झेल घेतला होता. हा सामन्याला वळण देणारा क्षण होता. पण आपल्यापेक्षा सूर्यकुमार यादवचा झेल जास्त चांगला होता असं अक्षर पटेल म्हणाला आहे. तो म्हणाला, "त्या झेलमुळे आम्हाला विश्वचषक मिळाला आणि मी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याबद्दल आनंदी आहे. मला दोन्ही हातांनी झेल घेऊ शकतो याचा विश्वास होता. पण चेंडू हवेत असतानाशेवटच्या सेकंदात मला उडी मारावी लागली, माझा एक हात लांब केला आणि चेंडू हातात आला".