Indian Cricket Team T20 World Cup 2024: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 (IPL 2024) नंतर एक जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. अशात टीम इंडियात अवघ्या पाच दिवसात अमेरिकेला (America) कशी रवाना होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण एका रिपोर्टनुसार टीम इंडिया (Team India) आयपीएलदरम्यानच अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलदरम्यान टीम इंडिया अमेरिकेला
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतीय क्रिकेट संघ टी20 वर्ल्ड कपसाठी 21 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. टीम इंडियाचे जे खेळाडू आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये खेळणार नाहीत, ते खेळाडू अमेरिकेसाठी रवाना होतील. आता कोणते खेळाडू प्ले ऑफमध्ये खेळताना दिसणार नाहीत, हे पाहाणंही उत्सुकतेचं असणार आहे. 


आयीसीने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी संघांची घोषणा करण्याची डेडलाईन 1 मे ठेवली आहे. म्हणजे 1 मे च्या आत सर्व संघांना आपला 15 खेळाडूंचा संघ जाहीर करावा लागणार आहे. आता बीसीसीआय (BCCI) टीम इंडियाची घोषणा कधी करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियात विकेटकिपरसाठी तब्बल पाच खेळाडूंमध्ये चुरस आहे. यात ऋषभ पंत, केएल राहुल, ईशान किशन, संजू सॅमसन आणि दिनेश कार्कितचा समावेश आहे. आशिवाय सलामीच्या फलंदाजासाठीही शर्यत आहे. यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड कि शुभमन गिलला संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.


विराट कोहलीला संधी मिळणार
टीम इंडियात सर्वात मोठी घडामोड असणार आहे ती विराट कोहलीच्या निवडीची. आयपीएलपूर्वी विराट कोहलीची टी20 संघात निवड होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आयपीएलमध्ये विराट कोहलीचा तुफान फॉर्म बघता बीसीसीआय निवड समितीला विराट कोहलीला डावलून चालणार आहे. विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल 500 धावांचा टप्पा पार केलाय. पर्पल कॅपच्या शर्यतीतही तो अव्वल स्थानावर आहे. 


भारतीय संघाचं वेळापत्रक
आयसीसी टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेतला दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला (India vs Pakistan) खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 12 जूनला यजमान अमेरिकेविरुद्ध आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध खेळला जाणार आहे. पहिले तीनही सामने न्यूयॉर्कमधले खेळवले जाणार आहेत.