मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाकडे एक हुकमी एक्का आहे. ज्याच्या मदतीनं टीम इंडिया विजयापर्यंत पोहोचू शकते. टीम इंडियाच्या भात्यात एक सिक्रेट वेपन आलं आहे. हे सिक्रेट वेपन प्रत्यक्ष मैदानात उतरणार नसलं, तरी डगआऊटमधून विरोधी संघाला गारद करायला ते पुरेसं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 40व्या वर्षीही फिटनेसमध्ये तरुणांना लाजवणारा, जागतिक स्तरावर अनेक स्पर्धा जिंकण्याचा अनुभव असेलला दिग्गज खेळाडू म्हणजे अर्थातच महेंद्रसिंह धोनी. माहीच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत 4 आयपीएल ट्रॉफी मिळवल्या आहेत. टी-२० वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआयनं महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियाचा मेंटॉर केलं आहे. हा वर्ल्ड कपचा गेमचेंजर ठरू शकतो. माहीच्या तगड्या अनुभवाचा विराट सेनेला मोठा फायदा होणार आहे.


धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2011चा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2 वेळा चॅम्पियन्स लिग आणि 4 आयपीएल माहीच्या नेतृत्वातील टीमनं जिंकले आहेत. 


2013 नंतर भारतानं कोणतीही मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली नाही. टीममध्ये वारंवार बदल करणं, बॅटिंग लाईनअपमध्ये प्रयोग, ओपनिंग पार्टनरशिप पक्की नसणं अशी अनेक कारणं आहेत. आताची टीम इंडिया स्वतः भक्कम असताना आता त्याला माहीच्या तगड्या अनुभवाचीही जोड मिळणार आहे.


धोनीला 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. त्यानं 6 वेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. कोणत्या परिस्थितीत कोणती खेळी खेळायची, हे त्याला अचुक माहिती आहे. सूर्यकुमार यादव, राहुल चहर, ईशान किशन, वरूण चक्रवर्ती यांचा हा पहिला वर्ल्ड कप आहे. धोनीच्या अनुभवी सल्ल्याचा त्यांना फायदा होईल. विराट कोहलीलाही निर्णय घेताना धोनीची मोलाची मदत होणार आहे. 


संघाचा कर्णधार असताना 'कॅप्टन कूल' अशी ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी आता तो संघात नसला, तरी डगआऊटमध्ये बसून तो टीम इंडियाला विजयपथावर नेईल, यात शंका नाही.