विराट कोहलीसाठी सीमेपलीकडून प्रेमाचा संदेश, टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर पाकिस्तानी चाहतेही झाले भावुक
विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. सीमेपलीकडे म्हणजे पाकिस्तानातही विराट कोहलीचा मोठा चाहता वर्ग आहे
T20 World Cup 2021, Virat Kohli : टी-20 विश्वचषकातून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही प्रवास संपला आहे. टी२०चं कर्णधारपद सोडणार असल्याचं विराट कोहलीने स्पर्धेआधीच जाहीर केलं होतं. रवी शास्त्री यांचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ विश्वचषक स्पर्धेनंतर संपणारच होता. आता राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. काल विश्वचषक स्पर्धेत नामिबिया संघाविरोधात भारतीय टी२० संघाचा कर्धणार म्हणून विराट कोहलीचा अखेरचा सामना होता. या सामन्यानंतर विराट कोहलीचे लाखो चाहते भावूक झाले होते. सोशल मीडियावरही विराटसाटी अनेक पोस्ट करण्यात आल्या.
विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. कोहलीचे सीमेपलीकडे म्हणजेच पाकिस्तानमध्येही अनेक चाहते आहेत. विराटने टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर केवळ भारतीय चाहतेच नाही, तर पाकिस्तानातील त्याचे चाहतेही भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर विराटवरचं प्रेम दाखवण्यात पाकिस्तानी चाहतेही मागे नाहीत. पाकिस्तानी पत्रकार इम्रान सिद्दिकी यांनी ट्विट केलं आहे, एक गोष्ट आपण सर्वजण मनापासून जाणतो आणि विश्वास ठेवतो की विराट महान आहे. विराट कोहली हा खरा स्पोर्ट्सपर्सन आहे. पाकिस्तानकडून त्याच्यावर खूप प्रेम.
दुसरीकडे पत्रकार शिराज हसनने विराटच्या नावाची पाकिस्तानी जर्सी घातलेल्या चाहत्याचा फोटो शेअर केला आहे. विराट कोहलीच्या या चाहत्याचे नाव आहे अवैश निजामी.
आयसीसी विश्वचषकात नामिबियाविरुद्ध टी-20 सामन्यात अखेरचं नेतृत्व करणाऱ्या विराटने देशाच्या संघाचं नेतृत्व करणं हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचं म्हटलं. मला संधी दिली आणि मी माझी सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न केला, पण इतरांसाठी जागा तयार करणं आणि पुढे जात रहावं लागतं. स्पर्धेत संघ ज्या पद्धतीने खेळला त्याचा मला गर्व असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे.