Sunil Gavaskar Angry On Team India: भारताने रविवारी न्यूयॉर्कमधील नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत झालेला पाकिस्तानविरुद्धचा सामना अवघ्या 6 धावांनी जिंकला. भारताने हा सामना जिंकला असला तरी सामन्यातील भारतीय संघाची फलंदाजीची पडझड पाहून माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर प्रचंड संतापले आहेत. गावसकरांनी रोहित शर्माच्या संघांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. भारतीय संघ या सामन्यामध्ये 119 धावांमध्ये तंबूत परतल्याचं पाहून गावसकर यांनी भारतीय फलंदाज बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय संघाने आपल्या शेवटच्या 7 विकेट्स अवघ्या 30 धावांमध्ये गमावल्या. ऋषभ पंत वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. पंत वगळता एकाही भारतीय फलंदाजाला वैयक्तिक धावसंख्येत 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. यावरुन गावसकरांनी संताप व्यक्त केला आहे.


भारतीय संघाची पडझड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघची चौथी विकेट सूर्यकुमार यादवच्या रुपात 12 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या 89 वर असताना पडली. त्यानंतर शिवम दुबे स्कोअरबोर्ड 95 वर असताना तंबूत परतला. पंत संघाची धावसंख्या 96 वर असतानाच तंबूत परतला. रविंद्र जडेजा पहिल्याच बॉलवर भोपळाही न फोडता झेलबाद झाला. हार्दिक पंड्याने 7 धावांची भर घालून 112 वर स्कोअरबोर्ड असताना तंबूत परतला. बुमरहाला धावसंख्येत एकाही रनची भर घालता आली नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर अर्शदीप आणि मोहम्मद सिराजने केलेल्या 7 धावांची पार्टरनशीप केली आणि ती सामन्याच्या शेवटी निर्णायक ठरली. 


गावसकरांचा संताप


भारतीय संघाची ही पडझड पाहून पहिला डाव संपल्यावर गावसकर यांनी 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलताना आपला संताप व्यक्त केला. भारतीय फलंदाज या सामन्यात गर्विष्ठ आणि बेपर्वा खेळाडूंप्रमाणे वागल्याचा टोला गावसकरांनी लगावला. ज्या पद्धतीने या क्रिकेटपटूंनी आपल्या विकेट्स फेकल्या ते पाहून गावसकर यांनी खेळाडूंनी परिस्थिती समजून फलंदाजी करायला हवी होती असं म्हटलं. 


नक्की वाचा >> T20 World Cup: 'मी बुमराहबद्दल फारसं...', पाकिस्तानला हरवल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माचं सूचक विधान


ही काही आयर्लंडची गोलंदाजी नव्हती


"भारतीय फलंदाजांची ही कामगिरी फारच निराशाजनक आहे. मला वाटतं ते फार गर्विष्ठ आणि बेपर्वापणे खेळले. त्याच्या फलंदाजीमध्ये गर्विष्ठपणा सुरुवातीपासूनच दिसत होता कारण ते प्रत्येक बॉलवर मोठा फटका मारु पाहत होते. ही काही आयर्लंडच्या सामन्यासारखी खेळपट्टी नाही. हे काही आयर्लंडचे गोलंदाज नव्हते. मी हे म्हणतोय यामध्ये कुठेही आयर्लंडचा अपमान करु इच्छित नाही. मात्र भारत ज्यांच्याविरोध खेळतोय तो बॉलिंग अटॅक फार अनुभवी आहे असं मला सांगायचं आहे. जेव्हा चेंडू वळत असतो तेव्हा गोलंदाजांना थोडा सन्मान देत संयमानं खेळणं अपेक्षित असतं. एक ओव्हर शिल्लक राहिलेली असताना संघ तंबूत परतला यावरुन संघ उत्तम मानसिकतेनं खेळत नसल्याचं जाणवतं. अजून 6 धावा केल्या असत्या तर ते 125 पर्यंत पोहोचले असते आणि त्याचा वेगळा परिणाम झाला असता," असं गावसकर म्हणाले.