Irfan Pathan Makeup Artist Dies : वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 चे सुपर-8 सामने खेळवले जात आहेत. या दरम्यान एक दु:खद बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट समालोचक इरफान पठाणचा खासगी मेकअप आर्टिस्ट फयाज अन्सारी याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. 21 जूनला वेस्ट इंडिजमध्ये ही दुर्देवी घटना घडली. फयाज अन्सारी हा इरफान पठाणबरोबर वेस्टइंडिजमध्ये गेला होता. या घटनेने फयाज अन्सारीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिजोनरहून मुंबईत
मृत फयाज अन्सारी बिजनोरमधल्या नगीना गावचा राहाणारा होता. 22 वर्षांपूर्वी फयाज बिजनोरहून मुंबईत आला. मुंबईत त्याने आपलं स्वत:चं सलून सुरु केलं. यादरम्यान इरफान पठाण हेअरकट आणि मेकअपसाठी फयाजच्या सलूनमध्ये जात होता. इथूनची त्यांची ओळख झाली. पुढे इरफान पठाणने फयाज अन्सारीला खासगी मेकअप आर्टिस्ट म्हणून नियुक्त केलं, इरफान फयाजला अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवरही घेऊन जात होता. 


2 महिन्यांपूर्वी लग्न
फयाज अन्सारी याचा चुलत भाऊ मोहम्मद अहमद याने दिलेल्या माहितीनुसार फयाजचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याच्या आठ दिवस आधीच तो बिजनोरहून मुंबईला आला होता. अचानक घडलेल्या या घटनेने पत्नीला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद अहमदने दिलेल्या माहितीनुसार 21 जूनला संध्याकाळी त्याच्या मृत्यूची बातमी आली. फयाज अन्सारी वेस्ट इंडिजमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहात होता, त्या हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला.



मृतदेह भारतात आणणार
इरफान पठाणने फयाज अन्सारीचा मृतदेह भारतात पाठण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. दोन ते तीन दिवसात फयाज अन्सारीचा मृतदेह भारतात आणला जाईल अशी माहिती मोहम्मद अहमदने दिली आहे.