भारतासहीत 6 संघांची सुपर-8 मध्ये धडक, 10 संघ स्पर्धेतून आऊट... असं आहे समीकरण
T20 World Cup 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर 8 चा थरार सुरु होईल. आतापर्यंत सहा संघांनी सुपर-8 मध्ये प्रवेश केलाय. यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाचा समावेश आहे. तर तीन बलाढ्य संघांना ग्रुपमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.
T20 World Cup 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप सामने संपत आलेत आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती सुपर-8ची (Super-8). रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) ग्रुपमध्ये सलग तीन सामने जिंकत दिमाखात सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय सहा संघांनी धडक मारलीय. तर पाकिस्तान, श्रीलंकेसह दहा संघांवर ग्रुपमध्येच गाशा गुंडाळण्याची नामु्ष्की ओढावली आहे. सुपर-8 चं वेळापत्रकही जवळपास निश्चित झालं आहे. उरलेले दोन संघ कोणते याचा निकाल लागायचा आहे.
टीम इंडियाचं सुपर-8 वेळापत्रक
सुपर-8 मध्ये टीम इंडियाला तीन सामने खेळायचे आहेत. (Team India Super-8 Scheduled) टीम इंडियाचा पहिला सामना 20 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 22 जूनला ग्रुप डीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाबरोबर सामना खेळवला जाईल. तर 24 जूनला टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल.
6 संघांनी केलं क्वालीफाई
टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 मध्ये भारतासहित सहा संघांनी प्रवेश केलाय. ग्रुप ए मधून भारत आणि अमेरिका, ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलिया, ग्रुप सी मधून अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिज तर ग्रुप डी मधऊन दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 मध्ये धडक मारलीय. ग्रुप बी आणि ग्रुप डीमधले दोन संघ अद्याप ठरायचे आहेत.
दिग्गज संघ बाहेर
यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये बलाढ्या संघांना ग्रुप सामन्यात मोठा धक्का बसला आहे. यात पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. यााशिवाय कॅनडा, आयर्लंड, नामिबिया, ओमान, पीएनजी, युगांडा, नेपाळ संघांचा समावेश आहे. बलाढ्य पाकिस्तानला तीनपैकी एकच सामना जिंकता आला. तर ग्रुप सीमध्ये न्यूझीलंडलाही तीन पैकी एक सामना जिंकता आालाय. ग्रुप डीमध्य े श्रीलंका संघाला तर तीनपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही.
19 जूनपासून सुपर-8 चे सामने
सुपर-8 सामन्यांना 19 जूनपासून सुरुवावत होणार आहे. यात पहिला सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान होणार आहे. तर सुपर-8 चा शेवटचा सामना अफगाणिस्तान आणि ग्रुप-डी मधल्या दुसऱ्या स्थानावरील संघांदरम्यान होणार आहे. यानंतर सेमीफायनलचा पहिला सामना 26 जूनला तर सेमीफायनलचा दुसरा सामना 27 जूनला खेळवला जाईल. 29 जूनला टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगेल. हा सामना वेस्टइंडिजच्या बारबाडोसमध्ये होईल.