आयसीसी टी- 20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup) उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध भारताच्या (Ind vs Eng) मानहानीकारक पराभवानंतर संघावर चहुबाजूंनी टीका होत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांमध्ये भारताने फारच निराशाजनक कामगिरी केलीय. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला एकही विकेट घेता आली नाही. यावरुन जगभरातून भारतीय संघांवर टीका करण्यात येत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने (wasim akram) या अपयशाचं खापर आयपीएएल (IPL) वर फोडलं आहे. आयपीएल युवा वेगवान गोलंदाजांना कशा प्रकारे उद्ध्वस्त करत आहे हे अक्रमने सांगितले. यानंतर आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (sunil gavaskar) भारतीय संघावर संतापले आहेत. सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दलही भाष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळाडू जेव्हा आयपीएल खेळतात तेव्हा सर्व काही ठीक असते, पण भारतासाठी खेळताच त्यांना कामाच्या ओझ्याची आठवण होते, अशी बोचरी टीका सुनील गावस्कर यांनी केली आहे. आज तकसोबत सुनील गावस्कर यांनी याबाबत भाष्य केले आहे.  "तुम्ही आयपीएल खेळता. तेव्हा तुम्ही प्रवास करता. फक्त शेवटचा आयपीएलची स्पर्धा चार वेगवेगळ्या ठिकाणी झाली होती. बाकीच्यावेळी तुम्ही इकडे तिकडे धावत असता. तेव्हा थकत नाही का? तेव्हा कामाचा बोजा नसतो का? फक्त जेव्हा तुम्हाला भारतासाठी खेळायचे असते, तेव्हा तुम्हाला कामाचा बोजा येतो? ही गोष्ट चुकीची आहे," असे सुनील गावस्कर म्हणाले.


"वर्कलोड आणि फिटनेस एकत्र शक्य नाही. तुम्ही तंदुरुस्त असाल तर कामाचा ताण पडण्याचा प्रश्नच कुठे येतो? आपण मराठीत म्हणतो ना की आपण थोडे जास्त लाड करतो. ते थोडे कमी करायला हवेत. आम्ही तुम्हाला संघात घेत आहोत तसेच भरपूर रिटेनर फीसुद्धा देत ​​आहोत. जर तुम्ही कामाच्या ओझ्यामुळे खेळत नसाल तर रिटेनर फी देखील काढून घेतली पाहिजे," असेही गावस्कर म्हणाले.


दरम्यान, वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडल्यांतर भारत आता न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. 17 नोव्हेंबरपासून ही टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.