T20 World Cup South Africa Enters Final: टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवत फायनलमध्ये अगदी थाटात प्रवेश केला आहे. ब्रायन लारा क्रिकेट अकदामी येथील मैदानावर झालेला सामना दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्स राखून जिंकला. अफगाणिस्तानच्या फलंदाजीची अभूतपूर्व पडझड झाल्यानंतर 57 धावांचं टार्गेट दक्षिण आफ्रिकेने एका गड्याच्या मोबदल्यात 8.5 ओव्हरमध्येच गाठलं. अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकल्याचं सामन्याच्या पहिल्या ओव्हरपासूनच दिसून आलं. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांच्या माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा संघ 12 ओव्हरही मैदानात तग धरु शकला नाही. अगदी पहिल्या ओव्हरपासूनच अफगाणिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लागला आणि संपूर्ण संघ 11.5 ओव्हरमध्ये अवघ्या 56 धावांवर तंबूत परतला. धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या ओव्हरला क्विंटन डिकॉक बाद झाला. डिकॉक वगळता दक्षिण आफ्रिकेने एकही विकेट न गमावता सामना जिंकला. या विजयासहीत दक्षिण आफ्रिकेने आपला उपांत्यफेरीत कच खाण्याचा नकोसा इतिहास बाजूला सारत 'चोकर्स' हा टॅग यंदातरी पुसला आहे. 


पहिल्या ओव्हरपासून विकेट्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फंलदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याचा अफगाणिस्तानचा मानस होता. मात्र मागील काही सामन्यांपासून प्रचंड फॉर्ममध्ये असलेल्या रेहमानुल्ला गुरबाझ भोपळाही न फोडता पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला. तिसऱ्या ओव्हरला गुलबदीन नबी बाद झाला. त्यानंतर चौथ्या ओव्हरला झारदान तंबूत परतला. दोन चेंडूंनंतर त्याच ओव्हरला मोहम्मद नबीही बाद झाला.


पाच ओव्हरमध्ये 25 वर अर्धा संघ तंबूत


पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अफगाणिस्तानची पाचवी विकेट पडली. यावेळेस 5 ओव्हरवर 23 धावांवर अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर सातव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ओमरात्झी बाद झाला. दहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जनत तंबूत परतला. त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर नूर अहमद बाद झाला. 10 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या 50 वर असताना कर्णधार राशीद खानच्या रुपात अफगाणिस्तानची 9 वी विकेट पडली. 56 धावांवर नवीन-उल-हकच्या रुपात अफगाणिस्तानने 10 वी विकेट गमावली. अफगाणिस्तानच्या सुमार कामगिरीची कल्पना यावरुनच येईल की या 56 धावांपैकी 13 धावा अथिरिक्त होत्या. ओमरात्झी हा 10 धावांसहीत वैयक्तिक स्तरावर दुहेरी धावसंख्या गाठणारा अफगाणिस्तानचा एकमेव खेळाडू ठरला.


अफगाणिस्तानच्या नावावर नकोसा विक्रम


दक्षिण आफ्रिकेच्या एकूण पाच गोलदाजांनी गोलंदाजी केली. त्यापैकीही केशव महाराजने केवळ एक ओव्हर टाकली. केशव महाराज वगळता इतर चारही गोलंदाजांनी प्रत्येकी किमान 2 तर जास्तीत जास्त 3 विकेट्स घेतल्या. मार्के जॅन्सनने 3 ओव्हरमध्ये 16 रन देत 3 गड्यांना बाद केलं. तबरीज शामझीनेही 3 विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा आणि एनरीज नॉर्टीज या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. एवढी कमी धावसंख्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना डिफेंड करता आली नाही. या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाच्या नावावर टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलमध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.


दुसरा सेमी-फायनलचा सामना


टी-20 वर्ल्ड कपमधील दुसरा सेमी-फायनलचा समाना भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 29 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानात अंतिम सामना खेळेल.