IND vs ENG : टी- 20 विश्वचषक 2022 चा (T20 World Cup 2022) दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात गुरुवारी अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतीय संघाची सुरुवात चांगली झालेली नाही. पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सुरुवात करणाऱ्या केएल राहुलला (KL Rahul) दुसऱ्याच षटकात ख्रिस वोक्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. केएल राहुल केवळ 5 धावा करुन बाद झाला आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोचा असल्याने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग तो पाहत आहे. या सामन्याच्या निकालावर भारतीय प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे कारण जर भारताने हा सामना जिंकला तर त्याची लढत थेट पाकिस्तानसोबत (Ind vs Pak) होणार आहे. मात्र पराभव झाला तर भारत या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा ठरत आहे. म्हणूनच याचा प्रेक्षकवर्गही मोठ्या प्रमाणावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच प्रत्यक्षात सामना पाहणाऱ्यांपेक्षा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन सामना पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ज्या प्लॅटफॉर्मवरुन हा सामना पाहिला जात आहे तिथे प्रक्षेपण करणाऱ्यांकडून जोरदार जाहिरातही (advertisement) केली जात आहे. प्रेक्षकवर्ग मोठा असल्याने ब्रॉडकास्ट (broadcast) करणाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा जाहिरातदारांकडून (advertiser) होत आहे. काही सेकंदांसाठी येणाऱ्या जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आकारणी करण्यात येत आहे. जाहिरातदारही आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी पैसे मोजत आहेत.


यावेळी टी-20 विश्वचषक स्पर्धा ब्रॉडकास्ट करणाऱ्यांसाठी आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे, कारण भारताने चांगली कामगिरी केली आहे. भारताने उपांत्य फेरी गाठल्याने जाहिरातदारही खूश आहेत. गेल्या विश्वचषकात, जाहिरातदारांचा कल खूपच कमी होता, कारण भारत पहिल्या फेरीतच बाहेर पडला होता. मात्र यावेळी चित्र उलटे आहे.


भारताने बऱ्याच वेळानंतर उपांत्य फेरी गाठल्याने जाहिरातींच्या किमती जास्त असतील असे तज्ञ्जांचे म्हणणे आहे. एनव्ही कॅपिटलचे सह-संस्थापक नितीन मेनन म्हणाले की, "टीव्ही जाहिरातीचे दर प्रति 10 सेकंद रुपये 15-18 लाख आहेत आणि डिस्ने+ हॉटस्टारवरील जाहिरात दर सीपीएम (प्रति मिली/हजार इंप्रेशनची किंमत) 850 रुपयांपर्यंत जाऊ शकतात."


ब्लिंक डिजिटलचे मीडिया प्रमुख सूरज करवी म्हणाले की, "भारत उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यापूर्वीच जाहिरातदार उत्साहित होते. आमच्या काही ग्राहकांनी   टी-20 वर्ल्ड कपमध्येही गुंतवणूक केली आहे. भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्याने, मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी जाहिरातदारांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत."


23 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याने डिस्ने + हॉटस्टारवर सर्वाधिक 18 दशलक्ष दर्शकांची नोंद केली होती. "भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान झालेल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. त्यामुळे जेवढी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात प्रेक्षकांची संख्या होती तेवढी इतर सामन्यांना नव्हती," असे करवी म्हणाले.


दरम्यान, जर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले तर दर्शकांची संख्या मोठी असू शकते. भारतातील चाहते या सामन्यासाठी प्रार्थना करत आहेत. या उत्साहामुळे जाहिरातीवर आणि दर्शकसंख्येवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.