VIDEO : टीम इंडियाच्या खेळाडूला भरमैदानात दिल्या शिव्या, रोहित शर्माला इतका राग का आला?
T20 World Cup : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो एका खेळाडूला भरमैदानात शिव्या देताना दिसतोय. रोहित शर्मा एवढा का संतापला असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडलाय.
T20 World Cup : T20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात भारतीय टीमने कांगारुंची शिकार केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात रोहितने स्फोटक खेळी खेळत 92 धावा काढल्या. रोहितच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांची मोठी धावसंख्येचे लक्ष्य दिलं. पण कांगांरुसाठी ही धावसंख्या काही मोठी नव्हती, असं त्यांना गृहित धरून चालणार नाही हे कर्णधार रोहितला चांगलच माहिती होती. त्यामुळे क्षेत्ररक्षण करण्यासाठी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंवर रोहितचं विशेष लक्ष्य होतं. अशातच टीम इंडियाची गोलंदाजी सुरू असताना असं काही झालं की भारतीय कर्णधार संतापला आणि त्याच्या तोंडून शिव्या निघाल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो नेमकं काय झालं ते.... या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करुन पहिल्याच षटकापासूनच रोहितने धमाकेदार खेळी खेळली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला धक्का बसला. रोहित येताच त्याने षटकार आणि चौकार मारले आणि अवघ्या 41 चेंडूत 92 धावांची अप्रतिम खेळी त्याने दाखवली. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनीही वेगवान खेळी करत भारताला मजबूत स्थितीत आणलं. टीम इंडियाने 5 विकेट गमावून 205 धावा केल्या, ही या विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या ठरवली.
असं काय घडलं ज्यामुळे रोहितला राग आला?
त्यानंतर गोलंदाजीचा प्रश्न आला तेव्हा अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला बाद केलं. अशा परिस्थितीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्याची संधी मिळाली होती. हीच संधीही दुसऱ्या षटकातच चालून आली होती पण.... जसप्रीत बुमराहचा चौथा चेंडू शॉर्ट पिच होता पण मिचेल मार्शला पुल शॉट नीट खेळता आला नाही. चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या भागावर आदळला आणि विकेटच्या मागे लेग साइडला उसळला. हाच क्षण होता जेव्हा भारतीय खेळाडूसह भारतीयांना वाटलं आता विकेट गेली. पण, यष्टिरक्षक ऋषभ पंत चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. हा चेंडू पकडण्यासाठी त्याने डायव्हिंग देखील केले नाही. त्यामुळे रोहितला राग आला आणि त्याने पंतवर राग काढला आणि त्याला शिवीगाळही केली.
मार्शने बाजी मारली पण...
रोहित शर्माचा भरमैदानात शिव्या देण्याचा हा व्हिडीओही व्हायरल झाला होता. हा झेल पंतसाठी किती कठीण होता हे आता तोच सांगू शकेल, पण मार्शला जीवदान मिळालं आणि त्याने आक्रमण खेळी करून चौकार गोळा करायला सुरुवात केली. तेव्हा टीम इंडियाला त्याचा फटका बसताना दिसत होता. मार्शने ट्रॅव्हिस हेडसोबत 81 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. मात्र, अक्षर पटेलने कुलदीप यादवच्या चेंडूवर आश्चर्यकारक झेल घेत मार्शचा डाव संपुष्टात आणला. त्यानंतर हळूहळू ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडू लागला आणि संपूर्ण संघ केवळ 181 धावांपर्यंत मजल मारू शकला. टीम इंडियाने हा सामना 24 धावांनी जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली.