नवी दिल्ली : आयपीएल (IPL 2021) संपल्यानंतर लगेचच टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात होत आहे. येत्या 17 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु होत असून टीम इंडियाकडे (Team India) खूपच कमी कालावधी आहे. पण त्याआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.  भारतीय संघाचा ऑलराऊंडर आणि मॅच विनर खेळाडू फॉर्मात परतला आहे. इतकंच नाही तर त्याने एकहाती सामनाही जिंकून दिला आहे. 


फॉर्मात आला मॅचविनर खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या (PBKS) सामन्यात हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सला (MI) दणदणीत विजय मिळवून दिला.


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सने पहिली फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 6 विकेट गमावत 135 धावा केल्या. विजयी लक्षाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली.


अवघ्या 61 धावात मुंबईचे तीन फलंदाज माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या सौरभ तिवारीने इनिंग सावरली खरी पण मॅचचा खरा हिरो ठरला हार्दिक पांड्या.


हार्दिक पांड्याने 30 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 40 धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने 19 षटकात 4 विकेट गमावत विजय मिळवला. या विजयाबरोबरच मुंबईने प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे.  


अष्टपैलू खेळीचा फायदा


टी 20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या भारतासाठी मोठा मॅचविनर खेळाडू ठरू शकतो. हरत आलेला सामना जिंकून देण्यात हार्दिक पांड्या माहिर आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत हार्दिक पांड्या भारतासाठी उपयुक्त ठरतो. जेव्हा भारतीय संघाला धावांची गरज असते तेव्हा हार्दिक आपल्या बॅटने खोऱ्याने धावा करतो. आणि जेव्हा विकेटची गरज असते तेव्हा आपल्या स्विंग गोलंदाजीने तो ही भूमिकाही चांगलीच निभावतो.


टीम इंडिया प्रबळ दावेदार


टी20 विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद यंदा भारताकडे होतं. पण कोरोना प्रादुर्भावामुळे टी20 विश्वचषक युएईमध्ये खेळवला जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला यंदाच्या टी20 विश्वचषक विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.


पण टीम इंडियाच्या विजेतेपदाला एका संघाकडून तगडं आव्हान मिळू शकतं. टी20 प्रकारात धोकादायक समजला जाणारा वेस्ट इंडिजचा (West Indies) संघ भारतासाठी डोकेदुखी ठरु शकतो. 2016 च्या टी20 विश्वचषकात वेस्टइंडिजने भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये हरवत बाहेरचा रस्ता दाखवला होता. यावेळी वेस्ट इंडिजनेच विजेतेपद पटकावलं होतं. 


17 ऑक्टोबरपासून सुरु होणार स्पर्धा


ICC T20 World Cup स्पर्धेला येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होईल. या स्पर्धेत 16 संघ सहभागी असून 16 नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.