पाकिस्तानी पत्रकार फरीद खान याने इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनची जाहीर माफी मागितली आहे. इंग्लंड संघाने पाकिस्तानविरोधातील मालिका खेळण्याऐवजी आयपीएल खेळले असते तर आगामी टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने जास्त फायदा झाला असता असं परखड मत मायकल वॉनने मांडलं आहे. मायकल वॉनच्या या विधानावर पत्रकार फरीद खानने नाराजी जाहीर केली होती. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीकाही केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे इंग्लंड संघाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पाकिस्तानचा पराभव केला आहे. दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. यानंतर फरीद खान याने मायकल वॉनच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्याने मायकल वॉनची जाहीर माफी मागितली असून, तो जे काही बोलला ते योग्य होतं असं म्हटलं आहे. 


यानंतर फरीद खान याने एक्सवर व्हिडीओ शेअर करत मायकल वॉनची जाहीर माफी मागितली आहे. 'मला माफ कर, मी माफी मागतो. तू बरोबर होतास आणि मलाच आता लाज वाटत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी आयपीएल प्लेऑफ आणि अंतिम सामना खेळायला हवा होता. रणजीचा संघही आमचा पराभव करु शकतो. दिल्ली कॅपिटल्स किंवा पंजाब किंग्स पाकिस्तानी संघाविरोधात एकतर्फी विजयी होतील. वर्ल्डकपमध्ये कॅनडा आणि अमेरिकेविरोधात होणाऱ्या सामन्यांची मला चिंता आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा सध्या सर्वात वाईट काळ सुरु आहे,' असं फरीद खानने म्हटलं आहे.



मायकल वॉननेही फरीद खानची माफी स्विकारली आहे. त्याने एक्सवर उत्तर देत 'तुझ्या माफीचा स्विकार' असं म्हटलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरोधातील टी-20 मालिकेसाठी आयपीएल प्लेऑफआधी आपल्या खेळाडूंना परत बोलावलं होतं. याच पार्श्वभूमीवर मायकल वॉनने हे विधान केलं होतं. 


मायकल वॉन म्हणाला होता की, '"मला वाटतं की तुम्ही सर्व खेळाडूंना घरी पाठवून चुकत आहात. मला वाटतं की विल जॅक्स, फिल सॉल्ट, जोस बटलर यांनी विशेषतः आयपीएलमधील एलिमिनेटरमध्ये खेळायला हवं होतं. त्यांना दबाव, गर्दी याचा अनुभव घेता आला असता. मी पाकिस्तानविरुद्ध टी-20 खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळणे चांगली तयारी आहे, असा युक्तिवाद करेल,” 


मायकल वॉनने आयपीएल हंगाम शेवटपर्यंत खेळल्यास खेळाडूंना फायदा झाला असता असं म्हटलं आहे. "मी नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बाजूने आहे. पण या स्पर्धेत फार दबाव आहे. या स्पर्धेत चाहते, मालक, सोशल मीडिया असा सगळीकडूनच दबाव आहे. विल जॅक्स, फिल सॉल्ट, जोस बटलर यांनी येथे थांबायला हवं होतं," असं त्याने सांगितलं होतं.