आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) टी-20 वर्ल्डकपचा (T20 World Cup) अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान अंतिम सामन्याआधी संघाच्या खेळाडूंचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी भारतीय खेळाडूवर जोरदार टीका केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगची (Arshdeep Singh) खिल्ली उडवली आहे. अर्शदीप सिंग हा भारतीय संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 15 विकेट्स घेतले असून अंतिम सामन्यात विकेट्स मिळवत तो अव्वल स्थानाही झेप घेऊ शकतो. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीला (16) मागे टाकण्यासाठी अर्शदीपला दोन विकेट्सची गरज आहे. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी अर्शदीपला त्याच्या फलंदाजीच्या कौशल्यावरून ट्रोल केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवज्योत सिंग सिद्धू यांनी इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अर्शदीप फलंदाजी करताना एकदम मागे जाऊन उभा असतो. तो एक मोठा फटका लगावण्याच्या तयारीत असतो. त्याने गोलंदाजासाठी सर्व स्टम्प खुले ठेवलेले असतात. पण गोलंदाजाने टाकलेला चेंडू त्याला खेळताही येत नाही. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. 


हा व्हिडीओ शेअर करताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी लिहिलं आहे की, "आत्मविश्वास 100 टक्के, पण कौशल्य शून्य टक्के". 



नवज्योत सिंग सिद्धू यांनी संपूर्ण स्पर्धेत अर्शदीपच्या गोलंदाजीचं कौतुक केलं आहे. दरम्यान ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कोणतेही कठोर शब्द वापरले अशून, उपहासात्मकपणे पोस्ट केल्याचं दिसत आहे. 


सेमी-फायनलमध्ये इंग्लंडविरोधातील सामन्यात अर्शदीप एकही विकेट मिळवू शकला नव्हता. पण अंतिम सामन्यात त्याचा विकेट घेण्याचा प्रयत्न असेल. अर्शदीपने आपल्या यशाचं सर्व श्रेय बुमराहला दिलं आहे. "याचं बरंच श्रेय जस्सी भाईला (जसप्रीत बुमराह) जातं, कारण तो फलंदाजांवर खूप दबाव टाकतो. तो एका षटकात तीन किंवा चार धावा देतो. यामुळे फलंदाज माझ्याविरुद्ध आक्रमक खेळतात आणि मी फक्त माझा सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे विकेट्स मिळण्याची खूप शक्यता असते,” असं तो म्हणाला होता.