T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात (Australia) रंगणाऱ्या या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला आहे. पण क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दरम्यानच्या महामुकाबल्यावर. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या स्पर्धेतून बाहेर पडला असतानाच तिकडे पाकिस्तानचा (Pakistan) प्रमुख गोलंदाज मात्र संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय. त्यामुळे सामन्याआधीच भारतीय संघाचं टेंशन वाढलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडघ्याच्या दुखापतीमुळे तब्बल सहा महिने संघाबाहेर असलेला पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आता पूर्णपणे फिट झाला असून मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. 


श्रीलंका दौऱ्यात शाहिन झाला होता दुखापतग्रस्त
श्रीलंका दौऱ्यावर असताना शाहिन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला. एशिया कप स्पर्धेतही (Asia Cup 2022) तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. दुबईवरुन शाहिन उपचारासाठी थेट लंडनला गेला होता. पण लंडनमध्ये त्याच्या उपचारावर झालेल्या खर्चावरुन चांगलाच गदारोळ माजला होता. पण आता शाहिन आफ्रिदी पूर्णपणे तंदरुस्त असून टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता आहे. 


भारताविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज
पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी शाहिन आफ्रिदीच्या फिटनेसबाबत माहिती दिली आहे. शाहिनशी त्याच्या दुखापतीबाबत बोलणं झालं असून तो 100 टक्के फिट असल्याचं रमीझ राजा यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात शाहिन खेळणार असून त्यानंतर होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यासाठी तो पूर्णपणे तयार असेल असंही रमीझ राजा यांनी सांगितलं. 


23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा महामुकाबला रंगणार आहे.