दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाला 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्यानंतर आता राज्य सरकारनेही भारतीय संघात असणाऱ्या मुंबईकर खेळाडूंना 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलं असून, विधीमंडळात सत्कार केला आहे. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त करताना सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलवर एक असं विधान केलं ज्यावर एकच हास्यकल्लोळ उडाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उभा राहिल्यानंतर सभागृहात एकच जल्लोष सुरु झाला. यावेळी 'इंडियाचा राजा, रोहित शर्मा' अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणा ऐकल्यानंतर रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य होतं. यावेळी रोहित शर्माने आपल्याला निमंत्रित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 


"सर्वांना पाहून बरं वाटलं. मुख्यमंत्र्यांनी मला आताच असा कार्यक्रम याआधी कधी झाला नसल्याचं सांगितलं. आमच्यासाठी असा कार्यक्रम ठेवला हे पाहून आम्हालाही बरं वाटलं. सर्वांना पाहून आम्हाला आनंद झाला आहे. काल मुंबईत आम्ही जे काही पाहिलं ते स्वप्नवत होतं. आमचंही वर्ल्डकप जिंकून भारतात आणण्याचं स्वप्न होतं. 11 वर्ष आम्ही वर्ल्डकप आम्ही थांबलो होतो. 2013 मध्ये आम्ही अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकलो होतो", असं रोहित शर्माने सांगितलं.



पुढे तो म्हणाला की, "मी संघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सर्वांचा आभारी आहे. कारण हे फक्त माझ्यामुळे किंवा यशस्वी, सूर्या, दुबेमुळे शक्य झालेलं नाही. सर्व खेळाडूंमुळे हे शक्य झालं. जो संघ मला मिळाला त्यासाठी मी भाग्यशाली आहे. कारण संघातील सर्व खेळाडू चांगले होते. कारण वेळ आली तेव्हा प्रत्येक खेळाडूने वेगवेगळ्या सामन्यात चांगली खेळी करुन जिंकवलं". 


"सूर्याने आताच सांगितलं की, त्याच्या हातात बॉल बसला. बरं झालं बसला, नाहीतर पुढे मी त्याला बसवला असता," असं रोहितने म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला