T20 World Cup 2024: टीम इंडियाचं टी-20 वर्ल्डकपचं मिशन आता काही दिवसांतच सुरु होणार आहे. दरम्यान यासाठीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे. 


भारताचा पहिला सामना आयर्लंडशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे, त्याआधी टीम इंडियाची ओपनिंग जोडी कोणती असणार आहे, हे रोहित शर्माला ठरवावं लागणार आहे. सध्या 15 खेळाडूंच्या टीममध्ये केवळ दोनच ओपनर्सची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी नावं आहेत. ही जोडी ओपनिंग करण्याची शक्यता आहे. मात्र काही रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करण्याची शक्यता आहे.


विराट-रोहित करणार ओपनिंग?


विराट कोहली टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळतो, मात्र तो गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली ओपनिंग करताना दिसला. यंदाच्या वर्षीही त्याने आरसीबीसाठी ओपनिंग केली. शिवाय यावेळी विराट कोहली सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज आहे. त्याच्या स्ट्राईक रेटवर टीका होत असली, तरी या आयपीएलमध्ये आक्रामक फलंदाजी केली होती. म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करताना दिसतील अशी दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत यशस्वी जयस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही आणि सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल.


कोहली-जयस्वाल करणार ओपनिंग?


काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यशस्वी जयस्वालने विराट कोहलीसोबत ओपनिंग मैदानात उतरावं. एकीकडे यामुळे भारताला वेगवान सुरुवात होण्यास मदत होईल तर दुसरीकडे परिस्थितीनुसार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवही तिसऱ्या- चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. मात्र, याची शक्यता फारच कमी दिसते. दुसरीकडे तर जयस्वाल आणि रोहितने ओपनिंग केली तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.


वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताचं वर्चस्व मानलं जातंय. त्यामुळे या सामन्यात काही प्रयोग करता येण्याची शक्यता आहे. मात्र टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानशी असून तो अत्यंत चुरशीचा असेल. या दोन्ही टीम्स 9 जूनला आमनेसामने येणार आहे. या सामन्यात छोटीशी चूकही महागात पडू शकते, त्यामुळे टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्मासोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही ओपनिंगच्या जोडीबाबत मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.