T20 World Cup: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताच्या `या` स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट!
23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
मेलबर्न : ICC T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी रंगणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात येईल. दरम्यान या सामन्यात एका स्टार खेळाडूची टीममध्ये खेळण्याची शक्यता कमी मानली जातेय.
नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा 6 रन्सने पराभव केला. भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील प्लेइंग 11 देखील निवडली असल्याचं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं आहे. अशा स्थितीत टीमचा एक तगडा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसणार नाही. त्याच्या नावावर टी-20 फॉर्मेटमध्ये शतकही आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा (Deepak Hooda) वर्ल्डकपच्या पहिल्या म्हणजेच पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे सध्याची प्लेईंग 11 आहे त्यानुसार हुडाला स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला काही सराव सामने खेळावे लागले. यामधील पहिला सराव सामना ऑस्ट्रेलियाशी खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही दीपकचा समावेश टीम इंडियामध्ये केला गेला नाही. यावरूनच हुड्डा पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 चा भाग नसल्याचीही अटकळ बांधण्यात येतेय.
याचं मुख्य कारण म्हणजे भारताकडे दीपकच्या जागी हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे दोन स्टार खेळाडू आहेत. इतकंच नाही तर सध्या हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्मामध्ये आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 चा भाग बनवायला संघाला नक्कीच आवडेल. त्यामुळे वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यातून दीपक हुडाचा पत्ता कट होऊ शकतो.