T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप स्पर्धा सुपर 8 साखळीपर्यंत पोहोचलेली आहे. मात्र असं असतानाही भारताचा एकही फलंदाज सर्वाधिक धावा कऱणाऱ्या पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत नसल्याने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे विराट कोहली अपेक्षित कामगिरी करत नसल्याने त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असताना अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात रोहित शर्मा लवकर बाद झाल्याने तोही टीकेचा धनी झाला आहे. यानंतर रोहित शर्मा डाव्या गोलंदाजांचा सामना करताना अपयशी होतो याचीही चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर रोहित शर्माची खिल्ली उडवली जात असून अनेक मिम्स शेअर होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी रोहितवर टीका करणाऱ्यांना त्यांची ओळख करुन दिली आहे. 150 पेक्षा जास्त T20 आणि 260 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित शर्मा भारतीय संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 साखळीत भारताने अफगाणिस्तानवर आरामात विजय मिळविल्यानंतर रोहितच्या विकेटवरुन टीका होत आहे. यावर आता सुनील गावसकर यांनी भाष्य केलं आहे. 


'तुम्ही रोहित शर्माला आपला गेम बदलण्यास सांगू शकत नाही'


"तो अनुभवी फलंदाज आहे. त्याला आपण काय करणार आहोत याची माहिती असते. गोलंदाजाचा अँगल वेगळा आहे म्हणून तुम्ही रोहित शर्माला आपला गेम बदल असं सांगू शकत नाही. हो पण कधीतरी तुम्ही अँगल वेगळा असल्याने त्या बाजूला फटके मारु नको असं सांगू शकतो. कदाचित एक्स्ट्रा कव्हरला इनसाईड-आऊट शॉट खेळा. या गोष्टी तुम्ही प्रयत्न करुन पाहू शकता आणि समजू शकता. तिथे बसून तुम्ही काय करायला हवे होते याचा विचार करता," असं सुनील गावसकर यांनी सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटलं.


टी-20 वर्ल्डकपमधील रोहितची कामगिरी


रोहित शर्माला अफगाणिस्तानच्या फारुकीने दुसऱ्याच षटकात बाद केलं. रोहितने 13 चेंडूत आठ धावा केल्या. भारतीय संघाने 20 षटकांत 181 धावा करत हा सामना जिंकला. भारतीय कर्णधाराने सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकामध्ये केवळ एक अर्धशतक झळकावलं आहे. आणखी एका कमी धावसंख्येमुळे रोहितची सरासरी (25.33) कमी झाली आहे. रोहितने 4 सामन्यांत 76 धावा केल्या आहेत.


"मर्यादित क्रिकेटमध्ये रोहित शर्माकडे बराच अनुभव आहे. हो, तो आऊट झाला आहे. दिवसाच्या शेवटी फलंदाज कोणत्या तरी पद्धतीने आऊट होणारच आहे. जर तुम्ही स्टम्पच्या मागे कॅच पकडून आऊट झालात तर ऑफ स्टम्पची बाजू कमकुवत आहे असं म्हणू शकत नाही जर तुम्ही 10 ते 15 हजार धावा केल्या असतील आणि 40 वेळा ऑफ स्टम्पच्या दिशेला आऊट झाला तर याचा अर्थ ती दुबळी बाजू आहे असं होत नाही," असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.