Suresh Rain Post on Shahid Afridi Latest News:  आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला पोहोचली आहे. येत्या 2 जून पासून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2024) थरार सुरू होईल. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात रोमांचक सामना होईल 9 जून रोजी... हा सामना असेल भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) असा... पारंपारिक प्रतिस्पर्धी या सामन्यात कशी कमाल दाखवणार? हे पाहणं औत्सुक्याचं असेल. मात्र, त्याआधी स्पर्धा सुरू झालीये ती भारत आणि पाकिस्तानच्या दोन माजी खेळाडूंमध्ये... होय, सुरेश रैनाने (Suresh Raina) पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) निवृत्तीबद्दल टोमणा मारला होता. यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता मोठी माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश रैना जेव्हा आयपीएलमध्ये समालोचन करत होता, तेव्हा आकाश चोप्रा याच्यासोबत बोलताना रैनाने शाहिद आफ्रिदीचा उल्लेख करत निवृत्तीनंतर पुनरागमन करण्याबद्दल आफ्रिदीची खिल्ली उडवली होती. आकाश चोप्राने सुरेश रैनाना विचारलं होतं की, तू पुन्हा टीम इंडियासाठी निवृत्ती मागे घेऊन खेळणार का? त्यावर रैनाने भन्नाट उत्तर दिलं. मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही, असं रैना म्हणाला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून पाकिस्तानी चाहते संतापले होते. काहींनी रैनाला सोशल मीडियावर शिवीगाळ देखील केली होती.


इम्रान सिद्दीकी नावाच्या एका पाकिस्तानी पत्रकाराने रैनाला डिवचलं होतं.  आयसीसीने शाहिद आफ्रिदीला ICC T20 World Cup 2024 साठी राजदूत म्हणून नियुक्त केलं आहे. तुझं काय? हॅलो सुरेश रैना, असं इम्रान सिद्दीकीने म्हटलं होतं. त्यावर रैनाने देखील चोख प्रत्युत्तर दिलं. मी कदाचित आयसीसीचा राजदूत नसेन, पण माझ्या घरी २०११ चा विश्वचषक आहे. मोहालीत खेळलेला सामना आठवतोय का? मला आशा आहे की त्या सामन्याच्या कटू आठवणी तुम्हाला सतावतील, असं रैनाने ट्विट केलं होतं. त्यावरून आणखी वाद पेटला होता. अखेर शाहिद आफ्रिदीला मध्यस्थी करावी लागली. आफ्रिदीने रैनाला फोन केला अन्....


वाद टोकाला गेल्यानंतर आफ्रिदीने यावर भाष्य केलं होतं. मी रैनासोबत अनेकदा खेळलो आहे. तो एक चांगला माणूस आहे. काही वेळा छोटेमोठे वादही होतात. सोशल मीडियावर त्याची पोस्ट पाहिल्यानंतर मी रैनाशी बोललो. रैनाने लहान भावाप्रमाणे परिस्थिती समजून घेतली. त्याने हे ट्विट डिलीट करण्याचंही मान्य केलं, असं आफ्रिदीने म्हटलं आहे. महान लोक त्यांच्या चुका लवकर सुधारतात, असंही शाहिद आफ्रिदीने यावेळी म्हटलं आहे. आता हा वाद आणखी पेटणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.


दरम्यान, तुम्हाला माहिती नसेल तर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा युवराज सिंग देखील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा ॲम्बेसेडर आहे. आफ्रिदीसोबत युवराज सिंग आणि ख्रिस गेल हे देखील टी-20 वर्ल्ड कपचे ॲम्बेसेडर आहेत. याशिवाय जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टचीही ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.