भारतीय संघाने रविवारी क्रिकेटच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकण्याची किमया केली. याआधी 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. दरम्यान या विजयासह भारताने 17 वर्षांचा दुष्काळ संपवत आयसीसी स्पर्धा जिंकली. सामना जिंकल्याने एकीकडे संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा होत असतानाच विराट कोहलीने (Virat Kohli) निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. चाहते यातून सावरत असतानाच कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आपण आता भारतीय संघासाठी टी-20 खेळणार नाही असं जाहीर केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. हा निर्णय नेमका कधी झाला, दोघांनी याबाबत कधी विचार केला याबाबत सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे. तसंच ड्रेसिंग रुममध्ये या निर्णयावर सर्वांच्या काय प्रतिक्रिया होत्या? आणि त्यांना आणखी एक वर्ल्डकप खेळण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न झाला याबद्दलही सांगितलं. 


विराट कोहली आणि रोहित शर्माला रोखण्याचा प्रयत्न


सूर्यकुमार यादवने 'आज तक'शी संवाद साधताना सांगितलं की, दोघांनाही निवृत्ती घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला, पण ते तयार झाले नाहीत. विराट कोहलीला आपल्या अखेरच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं. तर दुसरीकडे रोहित शर्माने कर्णधार म्हणून विजयासह संघाला निरोप दिला. 


भारतीय संघ चॅम्पिअन झाला असताना, सर्वजण भावूकही होते. जेव्हा दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्यात आणखी वाढ झाली असंही सूर्यकुमारने सांगितलं. तसंच डगआऊट आणि ड्रेसिंग रुममध्ये या दोघांना पुढचा वर्लडकप भारतात आहे, तुम्ही थांबा असं सांगण्याचा प्रयत्न होत असल्याची माहितीही त्याने दिली. 


सूर्यकुमारने सांगितलं की, "अशा क्षणी खेळ सोडणं फार कठीण असतं. इतक्या मोठ्या क्षणी त्यांनी निरोप घेतला ही चांगली बाब आहे. जेव्हा ते डगआऊट आणि ड्रेसिंग रुममध्ये बसले होते तेव्हा आम्ही हेच सांगत होतो की, आता फक्त दीड वर्ष बाकी आहे. दोन वर्षांनी भारतातच वर्ल्डकप होणार आहे. सगळेजण पुढील वर्षी पाहू, आता काही बोलू नका असंच सांगत होते. पण कदातिच दोघांनी आधीच निर्णय घेतला होता. मला वाटतं यापेक्षा चांगली संधी नाही".