T20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते
भारत-पाकिस्तान फायनलचं स्वप्न पाहणाऱ्या करोडो क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग, भारतीय खेळाडूंची ढिसाळ कामगिरी
Ind vs Eng T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात (Australia) खेळल्या जात असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताला (Team India) लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडने भारताचा (England Beat India) चार षटकं आणि 10 विकेट राखून दारून पराभव केला. पराभवामुळे टीम इंडियाचा T20 मधला प्रवासही इथेच थांबला. इंग्लंड आता 10 नोव्हेंबरला पाकिस्तानबरोबर (Pakistan vs Englad Final) फायनलमध्ये दोन हात करेल.
पाकिस्तान क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा (Pakistan beat New Zealand) पराभव करत फायनलचं तिकिट गाठलं. त्यामुळे टीम इंडियाकडून क्रिकेटप्रेमींच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना पाहिला क्रिकेटप्रेमी उत्सुक होते. पण करोडो क्रिकेट प्रेमींचं स्वप्न अखेर भंगलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर (Social Media) भारतीय क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणावर ट्रोल (Trolled) केलं जात आहे. भारतीय खेळाडूंनी केलेल्या चुकांवर भारतीय खेळाडू संतत्प झाले आहेत.
के एल राहुल (K L Rahul) आणि ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) खराब फॉर्मनंतरही त्यांना संघात का घेतलं यावर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींच्या मते यजुवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) सेमीफायनलमध्ये संधी मिळायला हवी होती असं मत व्यक्त केलं आहे. काहींनी तर के एल राहुला तात्काळ संघातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
टीम इंडियाची पहिली फलंदाजी
इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. पण भारताची सुरुवातच खराब झाली. के एल राहुल केवळ 5 धावा काढून बाद झाला. कर्णधार रोहित शर्माही मोठी खेळी करु शकला नाही. या संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारची बॅट सेमीफायनलमध्ये मात्र तळपली नाही. तो केवळ 14 धावा करु शकला. विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अर्धशतकी खेळ करत भारताला समाधानकारस धावसंख्या उभारून दिली. विराटने 50 तर पांड्याने 63 धावा केल्या.
इंग्लंडची दमदार कामगिरी
विजयाचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या इंग्लंडने सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरु केली. ओपनिंगला आलेला कर्णधार जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी पहिल्या षटकापासूनच धावांचा रतीब घातला. टीम इंडियाचा एकाही गोलंदाजाला प्रभावी गोलंदाजी करता आली नाही. बटलरने नाबाद 80 तर हेल्सने नाबाद 86 धावा करत इंग्लंडला फायनलमध्यो पोहोचवलं.