Pakistan : पाकिस्तान संघाला एकामागोमाग एक समस्यांचा सामना करावा लागत आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला (Pakistan Cricket Team) आधी अमेरिका आणि नंतर भारताविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. यामुळे पाकिस्तानवर लीगमध्येच स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पाकिस्तानच्या या निराशाजनक कामगिरीवर पाकचे माजी क्रिकेटर्स आणि चाहत्यांनी जोरदार टीका सुरु केली आहे. हे कमी की काय आता बाबर आझम (Babar Azam) आणि त्याच्या संघासमोर एक नवीन संकट येऊन उभं ठाकलं आहे. संपूर्ण संघाला तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये एका वकिलाने संपूर्ण संघासहित प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफविरोधात देशद्रोहाचा (Treason) गुन्हा दाखल केला आहे. बाबर आझमच्या संघाने संपूर्ण देशाला धोका दिल्याचा आरोप या वकिलाने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान संघावर बंदीची मागणी
पाकिस्तानमध्या गुजरांवाला शहरात राहाणाऱ्या एका वकिलाने बाबरआझमसह पाकिस्तान संघाविरोधात देशद्रोहाची याचिका दाखव केली आहे. यात खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचाही समावेश आहे. या वकिलाने पाकिस्तान संघावर अनेक गंभीर आरोप लगावले आहेत. भारत आणि अमेरिकाविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानमध्या करोडो क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचं या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे.


कर्णधार बाबर आझमच्या संघावर देशाची प्रतिष्ठा पणाला लावून फसवणूक करून पैसे कमावल्याचा आरोप या वकिलाने केला आहे. इतकंच नाही तर या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघावर बंदी आणण्याची मागणीही वकिलाकडून करण्यात आली आहे. पाकिस्तान मीडिया रिपोर्टनुसार ही याचिका दाखल करुन घेण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर तुरुंगात जाण्याची भीती वर्तवली जातेय.


भारत आणि युएसएविरोधात पराभव
पाकिस्तान क्रिकेट संघाची टी20 वर्ल्ड कपमधील सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने झाली. पण या नवख्या संघासमोर पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. टेक्सासच्या डलास स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 159 धावा केल्या, तर अमेरिकेनेही निर्धारित 20 षटकात तितक्याच धावा केल्या. त्यामुळे सामना सुपरओव्हरमध्ये रंगला. यात अमेरिकेने 5 धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. तर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. सलग दोन पराभवामुळे पाकिस्तान संघावर टीकेची झोड उठली आहे. सलग दोन पराभवामुळे पाकिस्तान संघाला सुपर एटमध्यो पोहोचण्यासाठी पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.