मुंबई : आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेत भारताचं (Team India) आव्हान साखळीतच संपुष्टात आलं आहे. सुरुवातीचे दोन सामने हरल्यानंतर भारताने शेवटचे तीन सामने मोठ्या फरकाने जिंकले खरे पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. गटातून पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाने सेमीफायनल गाठली.


शाहीन आफ्रिदीचा दणका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) भारताला दणका दिला होता. पाकिस्तानच्या या गोलंदाजाने सलामीला आलेल्या भारताच्या रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) बाद केलं. शाहिन आफ्रिदीसाठी ही स्वप्नवत कामगिरी होती. 


भारतीय क्रिकेटपटूंची केली नक्कल


स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा पाकिस्तान संघाचे चाहते बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शाहिन आफ्रिदीला चिअर करत होते. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहीन भारतीय फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या बाद झाल्याची नक्कल करताना दिसत आहे.


व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की शाहीन जेव्हा बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा चाहते तीन भारतीय खेळाडूंची नावे घेतात. यानंतर आफ्रिदी ते कसे बाद झाले याची नक्कल करताना दिसतो.


युजर्सने घेतला समाचार


या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर युजर्सने शाहीन आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका चाहत्याने म्हटलं आहे की याला हसन अली बनायचं आहे का?  हसन अली हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आहे जो विकेट घेतल्यानंतर विचित्र पद्धतीने आनंद साजरा करण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तानने साखळीत पाचही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी (PAK vs AUS Semifinal T20 World Cup 2021) होणार आहे.