`तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...`, T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशारा
T20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) दोघेही खेळण्याची शक्यता आहे. सध्याच्या आयपीएल हंगामात दोन्ही खेळाडूंनी आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांना प्रभावित केलं आहे. गुरुवारी सनरायजर्स हैदराबादविरोधातील सामन्यात विराटने 43 चेंडूत अर्धशतक ठोकलं. मात्र त्याच्या स्ट्राइक रेटवरुन टीका होत आहे. पण असं असलं तरी बंगळुरुचा स्टार फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली गतवर्षीच्या टी-20 वर्ल्डकपपासून या प्रकारात फारसे खेळलेले नाहीत. अफगाणिस्तानविरोधातील मालिकेतून दोघांनी टी-20 मध्ये पुनरागमन केलं होतं. रोहितने यावेळी शतक ठोकलं होतं. पण विराट फारशी चांगली कामगिरी केली नव्हती.
आगामी टी-20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार असून या खेळपट्टींवर विराट आणि रोहित शर्मा हवेत असं बोललं जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगलाही असंच वाटत आहे. दरम्यान यावेळी त्याने योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा सल्लाही दोन्ही दिग्गजांना दिला आहे.
वय वाढू लागल्यानंतर तुम्ही कितीही चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी वयाचीच चर्चा होते असा इशाराच युवराजने दोघांना दिला आहे. बीसीसीआयने आता भविष्यातील संघ उभारणीकडे लक्ष द्यावं असं सुचवताना टी-20 वर्ल्डकपनंतर विराट आणि रोहितने या प्रकारातून बाहेर पडावं असा सल्ला दिला आहे.
"तुमचं वय वाढू लागल्यानंतर लोक तुमच्या वयाबद्दल बोलतात. लोक तुमचा फॉर्म विसरुन जातात," असं युवराजने ICC ला सांगितलं. "हे दोघे भारतासाठी महान खेळाडू आहेत. त्यांची इच्छा असेल तेव्हा निवृत्ती घेण्याचा त्यांना हक्क आहे," असंही युवराजने म्हटलं.
पुढे त्याने म्हटलं आहे की, "मला टी-20 प्रकारात नव्या तरुण खेळाडूंना पाहायला आवडेल. कारण यामुळे अनुभवी खेळाडूंच्या खांद्यावरील ओझं कमी होईल. ते एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळू शकतील. या वर्ल्डकपनंतर अनेक तरुण खेळाडू संघात येऊन पुढील वर्ल्डकपसाठीचा संघ तयार करतील अशी आशा आहे".
टी-20 वर्ल्डकप संघ निवडण्यासाठी 1 मे अंतिम तारीख आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमिती प्रमुख अजित आगरकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यानंतर 15 सदस्यीय संघाची घोषणा होईल. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्डकप खेळला जाणार आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. आयपीएलमध्ये काही खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असल्याने निवड समितीसमोर अनेक पर्याय आहेत.