सचिनचा शोध अखेर संपला, ती व्यक्ती सापडली
क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरला अखेर तो शोधत असलेली व्यक्ती सापडली आहे.
मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरला अखेर तो शोधत असलेली व्यक्ती सापडली आहे. शनिवार १४ डिसेंबरला सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करुन या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मदत मागितली होती. आता यो दोघांची लवकरच भेट होऊ शकते.
सचिन तेंडुलकर आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाला होता, 'ही चेन्नईमधल्या मॅचवेळची गोष्ट आहे. मी हॉटेलमध्ये कॉफी मागितली. काही वेळानंतर एक व्यक्ती कॉफी घेऊन आला. मला तुमच्याशी क्रिकेटबाबत बोलायचं आहे. तुम्ही एल्बो गार्ड घालून बॅटिंग करता तेव्हा तुमच्या बॅटचा स्विंग बदलतो. मी तुमची बॅटिंग वारंवार बघितली आहे, असं तो मला म्हणाला. यानंतर मी एल्बो गार्डचं डिझाईन बदललं. मला आता त्या व्यक्तीला भेटायचं आहे.'
सचिन ज्या व्यक्तीला शोधत होता त्याचं नाव गुरुप्रसाद आहे. हा व्यक्ती वेटर असल्याचा समज पहिले झाला, पण तो हॉटेलचा सुरक्षा रक्षक होता. सचिनने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर २४ तासांच्या आत हॉटेल ताजने या व्यक्तीला शोधलं. 'आमच्या सहकाऱ्यासोबतची आठवण सांगितल्याबद्दल सचिन तेंडुलकरचे अभिनंदन. आम्ही त्याला शोधलं आहे आणि लवकरच तुमची आणि त्याची भेट होईल,' असं ट्विट हॉटेल ताजने केलं आहे.
'आपल्या आवडत्या खेळाडूला भेटणं ही कोणत्याही क्रिकेटप्रेमीची इच्छा असते. सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूला मला भेटायचं आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी जिकडे राहतो तिथले लोकं माझ्यापेक्षा जास्त उत्साही आहेत. त्यामुळे सचिनने मी आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवावा, अशी माझी इच्छा आहे,' असं गुरुप्रसाद म्हणाला.